Pimpri News: कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार पतीवर कडक कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांना साकडे

एमपीसी न्यूज – कौटुंबिक हिंसाचार कायदा आणि फसवणुकीच्या आरोपाखाली आपल्या पतीविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी एका परित्यक्ता मुस्लिम युवतीने थेट पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे केली आहे.

चिंचवडच्या वेता़ळनगरमधील एका 27 वर्षीय विवाहित महिलेने याप्रकरणी पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार अर्ज दिला आहे. त्यानुसार तिचा पती आफताब अहमद शेख (वय 36, रा. 645, फेमस बेकरीजवळ, नाना पेठ, पुणे) तसेच सासू आणि नणंद यांच्या विरोधात मानसिक छळ सुरूच ठेवल्याबद्दल तसेच फसवणूक केल्याबद्दल कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.

मानसिक त्रास, मारहाण, वारंवार पैशांची मागणी केल्याचा आरोप केला. तसेच पतीने न सांगता, घटस्फोट न देता दुसरे लग्न करून आपली व कायद्याची फसवणूक केली आहे, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.

पीडित महिलेचे 28 डिसेंबर 2008 रोजी आफताब शेख याच्याशी लग्न झाले. काही दिवसानंतर तो पत्नीवर संशय घेऊन तिला मारहाण करू लागला. लग्नात आपल्या आईने घातलेले दागिने पतीने (नवऱ्याने) काढून घेतले आणि माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावला.

हलाखीची परिस्थिती असतानाही पीडित महिलेच्या दोन्ही बाळंतपणांचा खर्च देखील तिच्या आईने केला. त्यानंतरही आफताब पैशाची मागणी करून मानसिक त्रास देत होता. त्याने पीडित महिलेला माहेरी आईकडे सोडून दिले.

गेली आठ वर्षे पीडित महिला तिच्या दोन मुलांसह आईकडे राहात आहे. मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी तिचा पती घेत नाही. एका मॉलमध्ये सेल्स गर्ल्स म्हणून नोकरी करून ती चौघांचा उदरनिर्वाह चालवत आहे.

सासू, नणंद तसेच कुटुंबातील अन्य सदस्यांशी संगनमत करून तिच्या पतीने परस्पर दुसरे लग्न केले. तसेच पीडित महिलेला आणि तिच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली. हा सर्व त्रास असह्य झाल्याने अखेर पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. चिंचवड पोलीस ठाणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात वारंवार खेटे घालूनही दखल घेतली जात नव्हती.

पीडित महिलेने माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांच्याशी संपर्क साधून मदतीसाठी विनंती केली. नाईक यांनीही सुमारे महिनाभर पाठपुरावा केल्यानंतर अखेर एक वर्षापूर्वी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवून घेण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात तिन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.

आफताब शेख या व्यक्तीविरोधात शिवाजीनगर, पुणे येथील न्यायालयात खटला दाखल केला आहे. परंतु तेथे देखील हा माणूस तारखेस हजर रहात नाही. हा देखील, मला मानसिक त्रास देण्याचाच प्रकार आहे. तरी संबंधित तिन्ही व्यक्तींविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत गुन्हा तसेच भादंवि 420 अंतर्गत गुन्हा दाखल करून न्याय द्यावा, अशी मी मागणी पीडित महिलेने केली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते व महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप नाईक हे या प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहेत. वारंवार तक्रार करूनही पीडित महिलेला न्याय मिळत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

नवीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून पीडित महिलेवरील अन्याय दूर करतील, अशी आशा आहे, असे नाईक म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.