Pimpri News : सवलतीच्या पासपोटी महापालिका PMPMLला देणार सव्वातीन कोटी

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड उद्योगनगरीतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह इतर नागरिकांना महापालिकेच्या वतीने प्रवासासाठी सवलतीच्या दरात पास देण्यात येतो. त्यानुसार, सन 2019-20मध्ये वितरीत केलेल्या विविध प्रकारच्या सवलत पासच्या प्रतिपूर्तीपोटी 3 कोटी 20 लाख 10 हजार रूपये महापालिकमार्फत पीएमपीएमएलला देण्यात येणार आहेत.

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महापालिका सेवक, महापालिका पदाधिका-यांकडील कर्मचारी, पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक आदींना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बस प्रवासात सवलत दिली जाते. त्यासाठी या नागरिकांना पास उपलब्ध करून देण्यात येतो. या पास सवलतीपोटी झालेला खर्च महापालिकेमार्फत पीएमपीएमएलला देण्यात येतो.

पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक यांनी 15 ऑक्टोबर 2020 आणि 17 नोव्हेंबर 2020 रोजी महापालिकेला पत्र पाठविले आहे. त्यामध्ये सन 2019-20 मध्ये वितरीत केलेल्या विविध प्रकारच्या सवलतीच्या पासच्या प्रतिपूर्तीपोटी 14 कोटी 34 लाख 55 हजार रूपयांची मागणी केली आहे. या रकमेपैकी डिसेंबर 2020 अखेर 11 कोटी 7 लाख रूपये पीएमपीएमएलला आगाऊ देण्यात आले आहेत.

पीएमपीएमएलने केलेल्या मागणीनुसार, दिलेल्या विविध प्रकारच्या पासची तपासणी करण्यासाठी 7 एप्रिल 2021 रोजी अधिकारी, कर्मचा-यांच्या नेमणूका करण्यात आल्या होत्या. या कर्मचा-यांनी आपला तपासणी अहवाल सादर केला आहे.

स्वातंत्र्य सैनिकांच्या मोफत पाससाठी प्रत्यक्षात 40 पाससंख्या ग्राह्य धरण्यात आली असून त्याची रक्कम 1 लाख 34 हजार रूपये होते. तसेच पीएमपीएमएलकडून दुर्धर आजाराच्या व्यक्तींना दिलेल्या पासपोटी 6 लाख 10 हजार रूपये मागणी नजरचुकीने करण्यात आली होती.

त्यानुसार 14 कोटी 34 लाख 55 हजार रूपयांमधून 7 लाख 44 हजार रूपये वजा करण्यात येणार आहेत. ही रक्कम वजा केल्यास उर्वरीत 14 कोटी 27 लाख 10 हजार रूपये पीएमपीएमएलला देण्यात येणार आहेत. तपासणी अहवालातून प्रमाणित झालेल्या 14 कोटी 27 लाख रूपयांमधून यापूर्वी आगाऊ दिलेले 11 कोटी 7 लाख रूपये वजा करण्यात येणार आहेत. त्यानुसार, 3 कोटी 20 लाख 10 हजार रूपये पीएमपीएमएलला विविध प्रकारच्या पासपोटी देण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.