Pimpri news: रेमडेसिवीर म्हणजे अमृत नाही, कोरोनाच्या ‘या’ रुग्णांनाच रेमडेसिवीरची आवश्यकता – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – आपला रुग्ण बरा झाला पाहिजे या प्रत्येकाच्या भावना आहेत. कोरोनाच्या उपचार पद्धतीत रेमडेसिवीर जणू काही अमृत आहे, अशी निर्माण झालेली भावना काढली पाहिजे. रेमडेसिवीरचा वापर योग्य रुग्णासाठी योग्यवेळी झाला तर, त्याचा वापर जास्त होतो, असे टास्क फोर्सने निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे टास्क फोर्सने कोणत्या रुग्णांना रेमडेसिवीरची आवश्यकता आहे हे सांगितले आहे, त्याचा पडताळा घ्यावा आणि मगच रेमडेसिवीरसाठी धावाधाव करावी, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.

 

रेमडेसिवीरचा तुटवडा, टंचाई जाणवत आहे. त्यासाठी तीन गोष्टी कारणीभूत आहेत. रुग्णसंख्येत झालेली प्रचंड वाढ, रुग्णसंख्येच्या प्रमाणात उत्पादन क्षमता नसणे. उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे रेमडेसिवीरचा अनावश्यक वापर होत आहे. तो आपण काही प्रमाणात कंट्रोल करू शकतो.

‘या’ रुग्णांनाच रेमडेसिवीरची आवश्यकता !

रुग्णाला ऑक्सिजन लेव्हल 92 च्या वर ठेवण्यासाठी बाहेरून ऑक्सिजन द्यावा लागत असेल. आजाराचा कालावधी बारा दिवसांच्या आत असेल तर, आपल्या रुग्णाला रेमडेसिवीरची आवश्यकता आहे. रुग्णाचा एचआरसीटी स्कोर 10 पेक्षा जास्त असावा आणि सायटोकाईन मार्करमध्ये नॉर्मल व्हॅल्यूपेक्षा तिपटीने वाढ असली तर रुग्णाला रेमडेसिवीरची गरज भासू शकते.

_MPC_DIR_MPU_II

सतत तीन दिवस शंभर डिग्रीच्यावर ताप आणि ऑक्सिजनची पातळी 92 च्या खाली असेल तर त्या रुग्णाला रेमडेसिवीरची गरज भासू शकते. रुग्णामध्ये डायबेटिक केटोएसिडोसीस असेल किंवा त्या रुग्णाला आधीपासून इम्युनोस्प्रेसंट औषधे सुरू असतील. एक्सरेवर निमोनिया दिसत असेल तर अशा रुग्णाला रेमडेसिवीरची आवश्यकता भासते, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

‘या’ रुग्णांना रेमडेसिवीरची आवश्यकता नाही !

रुग्णामध्ये सौम्य लक्षणे असतील तर रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज नाही. रुग्णाला अतिशय गंभीर आजार असेल. ज्यात अवयव निकामी व्हायला सुरुवात झाली आहे. किंवा मल्टी ऑर्गन फेल्यूअर असेल तर अशा प्रकरणांत रेमडेसिवीरचा उपयोग होत नाही.

आजाराचा कालावधी चौदा दिवसांपेक्षा जास्त असेल तरीही रेमडेसिवीरचा उपयोग होत नाही, हे टास्क फोर्सने सांगितले आहे. त्यामुळे आपल्या रुग्णाला खरोखर रेमडेसिवीरची आवश्यकता आहे का, याची पडताळणी करावी, असे डॉ.कोल्हे यांनी सांगितले.

डॉक्टर सांगतात रुग्णाकडून रेमडेसिवीरची मागणी केली जाते. तर ही मागणी सुद्धा टाळावी. रेमडेसिवीर म्हणजे अमृत नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. योग्य रुग्णांनाच योग्यवेळी रेमडेसिवीर मिळू शकले तर त्याचा तुटवडा, टंचाईसदृश्य परिस्थितीवर बऱ्यापैकी नियंत्रण आणू शकतो. त्याचवेळी ज्यांना खरोखर या इंजेक्शनची गरज आहे त्यांना ते इंजेक्शन मिळेल. अशी परिस्थिती आपण निर्माण करू शकतो, असे आवाहन खासदार डॉ. कोल्हे यांनी केले.

डॉक्टरांनी महाराष्ट्र सरकार, प्रत्येक जिल्ह्याची जी कोविड टास्क फोर्स आहे. उपचार पद्धती सांगितली आहे. त्याचे आपण काटेकोरपणाने पालन करावे. त्यामध्ये सूचना सुचवू शकता. पण, गाईड लायन्सचे पालन केले तर आता जी तुटवडासदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. ते नक्कीच टाळू शकतो, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.