Pimpri news: ‘वायसीएमएच’मध्ये जबड्याच्या दुर्मिळ आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया

55 वर्षीय महिलेला मिळाले जीवदान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात जबड्याच्या दुर्मिळ आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. 55 वर्षीय महिलेवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर या महिलेला जीवदान मिळाले. 

वायसीएम रुग्णालयात विविध अत्याधुनिक उपचार व शस्त्रक्रिया विभाग आहेत. यापैकी दंत चिकित्सा विभागात फेब्रुवारी महिन्यात अमिलोब्लास्टोमा या दुर्मिळ आजारावर रुग्णालयाच्या दंतचिकित्सा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे यांनी अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केली.

शस्त्रक्रियेनंतर 55 वर्षीय महिलेला जीवदान मिळाले असून एक महिन्यांच्या उपचारानंतर ती आता ठणठणीत बरी झाली आहे.

शाबीरा शेख या इंद्रायणीनगर भोसरी येथील महिलेला सहा वर्षांपूर्वी खालच्या जबड्याचा दुर्धर आजार झाला होता. अनेक खासगी रुग्णालयात उपचार घेतले परंतु त्यावर खात्रीशीर उपचार झाला नाही. जबड्याचे हाड कुजत चालल्याने दाताने अन्न चावतानाही वेदना होऊ लागल्या.

शेख या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेल्या असता शस्त्रक्रियेसाठी त्यांना एक लाख रुपयांचा खर्च सांगितला. त्यांचे पती खासगी सफाई कर्मचारी म्हणून अल्प मानधनावर काम करतात. त्यामुळे हतबल झालेल्या शेख यांच्या पतीने वायसीएम रुग्णालयातील दंतचिकित्सा डॉक्टरांकडे उपचार घेण्याचा निर्णय घेतला.

तपासणीनंतर दंत चिकित्सा विभागप्रमुख डॉ. यशवंत इंगळे यांनी जबड्याची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

जानेवारी महिन्यात शेख यांच्या जबड्याची शस्त्रक्रिया करून खालच्या जबड्याची कुजलेली हाडे काढून घेतली व टायटेनियम धातूच्या पट्टीचे रोपण केले. त्यानंतर रुग्णालयात एक महिना उपचार केले. शेख सध्या ठणठणीत असून त्यांना कोणताही त्रास नाही.

या दुर्मिळ आजारावर कोणताही खर्च न होता यशस्वी उपचार झाल्याने शेख यांनी समाधान व्यक्त करून उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले. दंत चिकित्सा विभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे यांच्या समवेत डॉ. दीपक पाटील, डॉ. श्रीनिवास, डॉ. अजिंक्य, डॉ. श्रद्धा म्हस्के यांनी शस्त्रक्रियेसाठी सहकार्य केले. यासाठी डॉ. तुषार पाटील पॅथॉलॉजी विभागप्रमुख आणि अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

दहा लाखात 1.7 टक्के रुग्णांना जबड्याचा अमिलोब्लास्टोमा हा दुर्मिळ आजार होतो. यात त्वरित आणि चांगले उपचार झाले नाही तर संबंधित रुग्णाला अत्यंत वेदना सहन कराव्या लागतात, असे दंत चिकित्सा विभागप्रमुख डॉ. यशवंत इंगळे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.