Pimpri News: हिवताप, डेंग्यूला आळा घालण्यासाठी खबरदारी घ्या, पालिकेचे आवाहन

हिवताप हा आजार 'एनॉफिलस' आणि डेंग्यू, चिकनगुनिया हे आजार पसरविण्यास 'एडिस इजिप्टाय' हे डास कारणीभूत असतात. हे ताप आल्यास तीव्र डोकेदुखी, अंगावर पुरळ येणे, स्नायू अथवा सांधेदुखी, मळमळणे, उलटी यापैकी लक्षणे आढळून येतात.

एमपीसी न्यूज – पावसाळ्यात हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनियासारखे साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी नागरिकांनी वेळीच खबरदारी घ्यावी. डासांच्या उत्पत्तीस आळा बसण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात,  असे आवाहन पिंपरी-चिंचवड पालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनियासारखे डासांमुळे उद्भवणारे साथीचे आजार पसरण्याची शक्यता असते. हिवताप हा आजार ‘एनॉफिलस’ आणि डेंग्यू, चिकनगुनिया हे आजार पसरविण्यास ‘एडिस इजिप्टाय’ हे डास कारणीभूत असतात. हे ताप आल्यास तीव्र डोकेदुखी, अंगावर पुरळ येणे, स्नायू अथवा सांधेदुखी, मळमळणे, उलटी यापैकी लक्षणे आढळून येतात.

हिवताप, डेंग्यू किंवा चिकनगुनिया झालेल्या व्यक्तीला डास चावला तर, रोग्याच्या रक्तातील हिवताप, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे विषाणू त्या रुग्णांच्या शरीरात शिरतात. असा विषाणूजन्य डास निरोगी माणसाला चावल्यास त्याला संबंधित रोग होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे या रोगांचा प्रसार थांबविण्यासाठी ‘एनॉफिलस’ आणि ‘एडिस’ डासांच्या उत्पत्तीवर आळा घालावा लागणार आहे.

घरात साठलेल्या स्वच्छ पाण्यावर मादी अंडी घालते. याचाच अर्थ डासांच्या उत्पत्तीसाठी साठलेल्या पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे घरात आणि घराजवळच्या परिसरात पाणी साठणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. त्याचप्रमाणे तापाची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी त्वरित आणि योग्य वैद्यकीय उपचार घ्यायला हवेत. ताप आल्यास रक्ताचा नमुना तपासून घ्यावा, असे आवाहन डॉ. साळवे यांनी केले आहे.

घरात पाण्याची साठवण केली जाणारी भांडी आणि घराभोवतीच्या परिसरात साचलेले सांडपाणी अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती होते. त्यासाठी परिसर स्वच्छ ठेवावा. घरातील फ्लॉवर प्लॉट, कुलर, मनीप्लँट, शोभेची छोटी कारंजे, फ्रीजचा खालचा ट्रे अशा ठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांना अंडी घालण्यास जागा मिळते. ही बाब लक्षात घेऊन घरातील पाणी साठविण्याची भांडी रिकामी करून कोरडी करून घेतल्यानंतर त्यात पुन्हा पाणी भरावे. घरावर असलेली पाण्याची टाकी किंवा तळघरातील टाकीत साठलेले पाणी अशा ठिकाणी डासांनी अंडी घालू नयेत, यासाठी या टाक्या पूर्णपणे झाकण टाकून बंद ठेवाव्यात.

घरातील फ्लॉवर प्लॉट, कुलर, मनीप्लँट, शोभेची छोटी कारंजे, फ्रीजचा खालचा ट्रे दर आठवड्यास रिकामे करून साफ करावेत. घराच्या मागील अंगणात किंवा गच्चीवरील भंगार मालाची विल्हेवाट लावावी. घराभोवतीची पाण्याची डबकी बुजवावीत किंवा वाहती करावी, असे आवाहनही डॉ. साळवे यांनी केले आहे.

ही घ्या काळजी!

# घरातील पाणी साठविण्याची भांडी पाणी वापरुन रिकामी आणि कोरडी करावी.
# त्यानंतर त्यामध्ये पुन्हा पाणी भरावे.
# घराभोवतीची पाण्याची डबकी बुजवावी किंवा साठलेले पाणी वाहते करावे.
# घरातील पाण्याचा टाक्या पूर्णपणे झाकण लावून बंद ठेवाव्यात.
# फुललदाणी, कुलर आणि फ्रिज खालील ‘ट्रे’मधील पाणी दर आठवड्यास रिकामे करावे.
# सर्वांनी मच्छरदाणीच्या वापर करावा.
# दरवाजे, खिडक्यांना जाळी बसवावी.
# नळ किंवा बोअरिंगच्या पाण्याची नासाडी थांबवावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.