Pimpri News : ‘अँटीबॉडी कॉकटेल’ उपचार पद्धती कोरोनावर प्रभावी, दोन रुग्ण पूर्णपणे बरे

पिंपरी येथील डॉ. डी वाय पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार

एमपीसी न्यूज – कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असताना ‘अँटीबॉडी कॉकटेल’ उपचार पद्धती कोरोनावर प्रभावी ठरत असल्याची दिलासादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी येथील डॉ. डी वाय पाटील रुग्णालय व संशोधन केंद्रात दोन कोरोना बाधित रुग्णांना ‘अँटीबॉडी कॉकटेल’ उपचार देऊन पूर्णपणे बरे केल्याचा दावा रुग्णालयाने केला आहे.

मोनोक्लोनल अँटीबॉडीजच्या वापरामुळे हा प्रयोग यशस्वी झाल्याचे रुग्णालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

या औषधामध्ये दोन कृत्रिम रेणूंचे मिश्रण जे कोरोना विषाणूंविरूद्ध नैसर्गिक मानवी प्रतिपिंडांची नक्कल करतात. हे औषध मोनोक्लोनल अँटीबॉडीज नावाच्या अत्यंत अत्याधुनिक औषधांच्या समूहांपैकी एक आहे. हे विविध प्रकारच्या आजारांविरूद्ध अत्यंत प्रभावी आहेत. या उपचार पद्धतीसाठी दोन रुग्ण निवडण्यात आले होते. यातील एक रुग्ण हा अतिजोखीम गटातील होता, तर दुसऱ्या रुग्णांमध्ये ताप, थकवा आणि इतर सौम्य लक्षणे दिसून आली होती.

दोन्ही रुग्णांची क्लिनिकल ट्रायल्ससाठी निवड करण्यात आली, या दोन्ही रुग्णांच्या रक्त वाहिनीमध्ये कासिरिव्हीमॅब आणि इंडेव्हिमॅब ही दोन इंजेक्शन्स सोडण्यात आली. ही औषधे शरीरात गेल्यावर विषाणूंना अवरोध करतात. त्यामुळे कोरोना विषाणूंना दुसऱ्या पेशीत प्रवेश करता येत नाही व कोरोना रोखण्यास मदत मिळते. 24 तासाच्या आत या रुग्णांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आले.

या उपचार पद्धतीद्वारे दोन्ही रुग्णांच्या शरिरातून कोरोनाची लक्षणे गायब झाली, शिवाय या उपचार पद्धतीमुळे त्यांना इतर कोणता त्रास किंवा दुष्परिणाम ही झाले नाहीत. त्यांना 14 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात आले.

‘अँटीबॉडी कॉकटेल’ उपचार पद्धतीद्वारे अतिजोखीम गटातील रुग्ण सात दिवसाच्या आत बरे होतात, अशी माहिती रुग्णालयाच्या श्वसन विकार विभागाचे प्रमुख डॉ. (नि. ब्रिगेडिअर) एम. एस. बरथवाल यांनी दिली. ते पुढे म्हणाले, कोरोनाच्या रुग्णामध्ये ‘अँटीबॉडी कॉकटेल’ उपचार पद्धतीद्वारे मोनोक्लोनल अँन्टीबॉडीज परिणामकारक काम करत असल्याचं समोर आलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.