Pimpri Corona Update : शहरात कोरोनासोबत म्युकरमायकोसिसचे रुग्णही घटले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्ह रेट कमी झाल्याने आता म्युकरमायकोसिसचे रुग्णही झपाट्याने घटत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उच्चांक एप्रिल आणि मे महिन्यात होता. त्यावेळी वायसीएम रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे दिवसाला 5 ते 6 रुग्ण दाखल होत. जूननंतर कोरोना पॉझिटिव्हची संख्या घटल्याने म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या दिवसाला 1 ते 2 रुग्ण इतकी कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या मृत्यू व संसर्ग होण्याचा वेग जास्त होता. परिणामी रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले होते. तर ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. अशा कठीण का‌ळात शहरात म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळल्याने परिस्थिती गंभीर झाली होती.

एप्रिल व मे महिन्यात दिवसाला म्युकरमायकोसिसचे सरासरी 4 ते 5 रुग्णांवर शस्त्रक्रिया होत. तर काही रुग्णांना शस्त्रक्रिया करण्यासाठी वेंटिगवर राहावे लागत होते. परंतु, आता कोरोना आणि म्युकरमायकोसिसचे रुग्ण कमी झाल्याने शस्त्रक्रियासाठी थांबावे लागत नाही. आता रुग्ण कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेवरच ताणही काही प्रमाणात कमी झाला आहे.

शहरात आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या एकूण 104 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 34 रुग्णांचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला. 55 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली.

आतापर्यंत शहरातील म्युकरमायकोसिसच्या 186 रुग्णांवर महात्मा फुले योजनेतून उपचार झाले आहेत. म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णांना उपचार करण्यासाठी 5 ते 15 लाखांपर्यंत खर्च येतो. त्यामुळे राज्य सरकारने या योजनेचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत केला. यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना दिलासा मिळाला आहे.

म्युकरमायकोसिसचे आतापर्यंतचे एकूण रुग्ण 271 होते. 104 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्य:स्थितीत 133 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.