Pimpri News : प्रवीण लडकत यांच्या पदावनतीने पाणीपुरवठा प्रकल्प रेंगाळण्याची शक्यता : उपमहापौर हिराबाई घुले

demotion of Praveen Ladkat

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनामध्ये प्रामाणिकपणे काम करणारे, भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसणारे प्रवीण लडकत यांची पदावनती अन्यायकारक आहे. त्यांच्याकडे शहराच्या पाणीपुरवठा विभागाची महत्वाची जबाबदारी आहे. त्यांना पदावनत केल्याने याचा परिणाम शहरातील प्रकल्पांवर होणार आहे. त्यामुळे एकप्रकारे पिंपरी-चिंचवडकरांना त्याचा फटकाच बसणार आहे. त्यामुळे त्यांना सन्मानाने पदोन्नती द्यावी आणि पाणी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी उपमहापौर हिराबाई घुले यांनी केली आहे.

पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता असलेले प्रवीण लडकत यांच्याकडील प्रभारी असलेले सहशहर अभियंता पद काढले आहे. त्यांच्याकडे कार्यकारी अभियंतपदाचा मूळ पदभार ठेवला आहे. याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना पत्र दिले आहे.

त्यात उपमहापौर घुले यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रवीण लडकत यांच्यावर अन्याय करत त्यांची पदावनती (डिमोशन) करण्यात आले.

वास्तविक आजपर्यंत लडकत यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. शहराच्या पर्यावरण क्षेत्रात पारदर्शीपणे काम करणारा नि:स्वार्थ अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. पाणीपुरवठा विभागातील त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीच्या निर्णयात  लडकत यांच्या कार्याचा आणि नि:स्वार्थ सेवेचा सन्मान करण्याऐवजी प्रशासनाने त्यांना खालच्या पदावर काम करण्याचे आदेश देत अवमानच केला आहे.

दुसरीकडे लडकत हे फेब्रुवारी 2022 मध्ये निवृत्त होणार आहेत. शहराची लोकसंख्या 25 लखांच्या घरात आहे. शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी नवीन स्त्रोत निर्माण होणे अपेक्षीत आहे. अशा परिस्थितीत अनुभवी अधिकाऱ्याच्या अनुभवाचा फायदा प्रशासनाने करुन घेतला पाहिजे. मात्र, प्रशासन  लडकत यांना पदावनती (डिमोशन) करुन अन्याय करीत आहे.

याचा परिणाम, शहरातील प्रकल्पांवर होणार आहे. त्यामुळे एकप्रकारे पिंपरी-चिंचवडकरांना त्याचा फटकाच बसणार आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करुन प्रशासनाने लडकत यांना सन्मानाने पदोन्नती द्यावी, अशी  मागणी  उपमहापौर घुले यांनी  केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.