Pimpri News : आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पातील दोन स्वतंत्र कामे एकाच ठेकेदाराला

एमपीसी न्यूज – आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पाअंतर्गत नवलाख – उंबरे ब्रेकप्रेशर टाकीपासून देहूपर्यंत पाण्याची गुरूत्व नलिका टाकण्यात येणार आहे. तसेच भामा आसखेड धरणावरील अशुद्ध जलउपसा केंद्रापासून नवलाख उंबरे येथील नियोजित ब्रेकप्रेशर टाकीपर्यंत रायझिंग मेन टाकण्यात येणार आहे. दोन्ही कामे एकाच ठेकेदाराला देण्यात येणार आहेत. त्यासाठी 149 कोटी 97 लाख रूपये खर्च होणार आहे. दोन ते तीन वर्षाच्या कालावधीत काम पुर्णत्वास न्यावे लागणार आहे.

पिंपरी – चिंचवड शहराच्या लोकसंख्यावाढीचा वेग, भविष्यातील सन 2045 पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन महापालिकेकडून सरकारला आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी आरक्षित करण्यासाठी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, सरकारने आंद्रा धरणातून 36.87 दशलक्ष घनमीटर आणि भामा आसखेड धरणातून 60.79 दशलक्ष घनमीटर असे एकूण 99.66 दशलक्ष घनमीटर पाणी कोटा आरक्षणास 24 ऑक्टोबर 2018 रोजी मान्यता दिली आहे. त्यास अनुसरून नवलाख – उंबरे ब्रेकप्रेशर टाकीपासून देहूपर्यंत पाण्याची गुरूत्व नलिका टाकण्यात येणार आहे.

तसेच भामा आसखेड धरणावरील अशुद्ध जलउपसा केंद्रापासून नवलाख उंबरे येथील नियोजित ब्रेकप्रेशर टाकीपर्यंत रायझिंग मेन टाकण्यात येणार आहे. या पाण्याचा वापर शहरात नव्याने विकसित होणा-या चिखली, च-होली, वडमुखवाडी, दिघी आणि मोशी परिसरासाठी होणार आहे. महापालिकेने यापूर्वी आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या कामासाठी डीआरए कन्सल्टंट यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. या दोन्ही कामांचा अर्थसंकल्प डीआरए कन्सल्टंट या सल्लागारांमार्फत तयार करण्यात आला.

महापालिकेच्या सन 2019-20 च्या मुख्य अर्थसंकल्पामध्ये असलेल्या पाणीपुरवठा विशेष योजना निधीतील ‘आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून शहरासाठी पाणी आणणे व तदअनुषंगिक कामे करणे’ या लेखाशिर्षाअंतर्गत आंद्रा आणि भामा आसखेड प्रकल्पासाठी काढण्यात येणा-या विविध टप्प्यातील निविदांकरिता लागणारी रक्कम खर्च करण्याचे विभागाचे प्रयोजन आहे. या लेखाशिर्षाअंतर्गत सन 2019-20 साठी 28 कोटी रूपयांची तरतुद उपलब्ध आहे. या लेखाशिर्षावर 15 जून 2019 रोजीच्या महापालिका सभेतील ठरावानुसार 500 कोटीची प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे.

सद्यस्थितीत नवलाख – उंबरे ब्रेकप्रेशर टाकीपासून देहूपर्यंत पाण्याची गुरूत्व नलिका टाकण्याच्या कामासाठी 101 कोटी 6 लाख रूपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. तर, भामा आसखेड धरणावरील अशुद्ध जलउपसा केंद्रापासून नवलाख उंबरे येथील नियोजित ब्रेकप्रेशर टाकीपर्यंत रायझिंग मेन टाकण्याच्या कामासाठी 61 कोटी 18 लाख रूपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यानुसार, एकूण 162 कोटी 24 लाख रूपये खर्चाच्या या दोन्ही कामांसाठी देशपातळीवर निविदा मागविण्यात आली. या निविदा नुकत्याच उघडण्यात आल्या आहेत.

गुरूत्व नलिकेसाठी 94 कोटी

नवलाख – उंबरे ब्रेकप्रेशर टाकीपासून देहूपर्यंत पाण्याची गुरूत्व नलिका टाकण्याच्या कामासाठी सात ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये ऑफशोर इन्फ्रास्ट्रक्चर्स (6.40 टक्के कमी), स्काय वे इन्फ्राप्रोजेक्टस (1.88 टक्के कमी) भूरलम कन्स्ट्रक्शन (0.92 टक्के जास्त), अरिहंत कन्स्ट्रक्शन्स (4.95 टक्के जास्त), काया अ‍ॅण्ड कंपनी कन्स्ट्रक्शन (5.22 टक्के जास्त), लक्ष्मी सिवील इंजिनिअरींग सर्व्हिसेस (11 टक्के जास्त) आणि जैन कन्स्ट्रक्शन (15.25 टक्के जास्त) असे सादर करण्यात आले. त्यापैकी ऑफशोर इन्फ्रास्ट्रक्चर्स यांनी सादर केलेला 6.40 टक्के कमी म्हणजेच 94 कोटी 60 लाख रूपये हा दर इतर निविदा धारकांपेक्षा लघुत्तम असल्याने स्विकारण्यात आला. तीन वर्षात त्यांना हे काम पूर्ण करावे लागणार आहे.

रायझिंग मेनसाठी 55 कोटी

भामा आसखेड धरणावरील अशुद्ध जलउपसा केंद्रापासून नवलाख उंबरे येथील नियोजित ब्रेकप्रेशर टाकीपर्यंत रायझिंग मेन टाकण्याच्या कामासाठी नऊ ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये ऑफशोर इन्फ्रास्ट्रक्चर्स (9.50 टक्के कमी), स्काय वे इन्फ्राप्रोजेक्टस (1.88 टक्के कमी) भूरलम कन्स्ट्रक्शन (0.92 टक्के कमी), अरिहंत कन्स्ट्रक्शन्स (2.25 टक्के कमी), महाविर सिवील इंजिनिअरींग अ‍ॅण्ड सर्व्हिसेस (2.64 टक्के कमी) गुडवील कन्स्ट्रक्शन (4.50 टक्के जास्त), पी. पी. गोगड (12.67 टक्के जास्त), देव इंजिनिअर्स (14.4 टक्के जास्त) आणि जैन कन्स्ट्रक्शन (17.23 टक्के जास्त) असे सादर करण्यात आले. त्यापैकी ऑफशोर इन्फ्रास्ट्रक्चर्स यांनी सादर केलेला 9.50 टक्के कमी म्हणजेच 55 कोटी 37 लाख रूपये हा दर इतर निविदा धारकांपेक्षा लघुत्तम असल्याने स्विकारण्यात आला. दोन वर्षात हे काम पूर्ण करावे लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.