Pimpri News : स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रभाग स्तरांवर बैठकांचे आयोजन करणार : अण्णा बनसोडे

आमदार निधी कामांचा दापोडीमधून शुभारंभ

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या आमदार निधीतून दापोडी व फुगेवाडी परिसरातील गणेश गार्डन, गणेश हाईट्स, सुखवानी वूड्स या हौसिंग सोसायटी परिसरात विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ नुकताच पार पडला. स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रभाग स्तरांवर बैठकांचे आयोजन करणार असल्याचे आमदार बनसोडे यांनी सांगितले.

दापोडी फुगेवाडी हौसिंग सोसायटीमधील नागरिकांनी परिसरातील अडचणी संबधी आमदार बनसोडे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. त्याची तात्काळ दखल घेत आमदारांनी निवारण केल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आमच्या सोसायटीचे काम मार्गी लागले असून आमची अडचण आमदारांनी दूर केली आहे. आमच्या मागणीची दखल घेत काम पार पाडले. त्या बद्दल आम्ही आमदारांचे आभार मानत आहोत, असे  गणेश हौसिंग सोसायटीचे चेअरमन रामुताज प्रजापती यांनी सांगितले.

स्थानिक नागरिकांना अनेक अडचणी असून कोरोनामुळे अनेक नागरिकांचा रोजगार गेला. अनेक जण आपले काम घरातून करत आहेत. मात्र, वीजपुरवठ्या संबधी अनेक समस्या आहेत. याबाबत लवकरच दापोडी, फुगेवाडी परिसरात आढावा बैठक घेण्यात येईल, असे बनसोडे यांनी सांगितले.

पुढील काळात प्रत्येक प्रभागात बैठका घेऊन नागरिकांच्या अडचणी समजावून घेणार आहे व त्या अडचणी सोडवण्यासाठी योजनाबद्द कार्यक्रम आखला जाईल, असे आमदार बनसोडे यांनी सांगितले.

आमदार बनसोडे यांनी यापूर्वीच त्यांच्या स्थानिक विकास निधी अर्थात आमदार निधीमधून वायसीएम रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन खरेदीसाठी 1 कोटी व कोरोना काळात आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किटसाठी 45 लक्ष निधी दिलेला होता.

या प्रसंगी नगरसेवक रोहित काटे, नगरसेविका माई काटे , नगरसेवक राजू बनसोडे, युवा नेते सिद्धार्थ बनसोडे, सनी ओव्हाळ, कार्यकर्ते व सोसायटीमधील पदाधिकारी व रहिवासी आदी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.