Pimpri News: युवा सेनेकडून सायकल रॅली काढून इंधन दरवाढीचा निषेध

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने केलेल्या अवास्तव पेट्रोल-डिझेल इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवा सेनेच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात सायकल रॅली काढण्यात आली. इंधन दरवाढीचा धिक्कार करत ‘पेट्रोल-डिझेल शंभरीपार, हेच का अच्छे दिन’ असा सवाल आंदोलकांनी केंद्र सरकारला केला.

इंधन दरवाढीविरोधात युवा सेना पिंपरी -चिंचवड शहरातर्फे फिनोलेक्स चौक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकापर्यंत सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. युवा सेना मावळ लोकसभा विस्तारक राजेश पळसकर, पिंपरी- चिंचवड शहर युवा सेना अधिकारी विश्वजित बारणे, रूपेश कदम, राजेंद्र तरस, युवती सेनेच्या प्रतीक्षा घुले, माउली जगताप, नीलेश हाके यांच्यासह युवा सैनिक यामध्ये सहभागी झाले होते.

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविताना ‘हेच का अच्छे दिन?’ असा सवाल करणारे फलक रॅलीमध्ये झळकवण्यात आले. इंधनाचे दर दररोज वाढत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त असून, महागाई वाढली आहे. ‘अच्छे दिन’चा नारा देऊन केंद्रात विराजमान झालेल्या मोदी सरकारने दीपावलीच्या तोंडावर जनतेला महागाईच्या दरीत लोटून अधिक संकटात टाकले आहे. तसेच केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.