Pimpri News: विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात मतदार नोंदणी करा – आयुक्त राजेश पाटील

एमपीसी न्यूज – आगामी महापालिका निवडणूकीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 1 ते 30 नोव्हेंबर 2021 दरम्यान घेण्यात येणार आहे. त्यामध्ये मतदार नोंदणी करता येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, बाळासाहेब खांडेकर उपस्थित होते.ज्या व्यक्तीचे वय 1 जानेवारी 2022 रोजी 18 किंवा अधिक असेल त्यांना 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे. पुनरीक्षण कार्यक्रमा अंतर्गत नागरिकांना मतदार नोंदणी ऑनलाईन पध्दतीने ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करता येणार आहे.

दिपावली- दिवाळी हा दिव्यांचा सण जगभरच्या प्राचीन संस्कृतीमध्ये दिवा हे प्रकाशाचं, सकारात्मकतेचं, आशेचं प्रतीक मानलं गेलं आहे. भारतीय संस्कृतीत दिवाळीच्या सणाला जितकं अनन्य महत्व आहे; तितकचं भारतीय निवडणूकांमध्ये विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाला, अन ओघाने मतदार यादीला. यंदाच्या नोव्हेंबरमध्ये दिवाळी आहे आणि विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमसुध्दा. हे औचित्य साधून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने यंदा लोकशाही दीपावली स्पर्धा आयोजित केली आहे.

मतदार याद्यांच्या अद्ययावती करणासाठी आणि मतदार नोंदणीचा नवीन अर्हता दिनांक जाहीर करण्यासाठी भारत निवडणूक आयोग दरवर्षी पुनरीक्षण कार्यक्रम राबवत असते. यंदा हा कार्यक्रम 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राबवला जाणार आहे. 1 नोव्हेंबर 2021 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच सर्व मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारुप मतदार यादी प्रकाशित केली जाईल.

महत्वाचं म्हणजे, या कार्यक्रमांतर्गत 1 जानेवारी 22 रोजी 18 किवा अधिक वय असलेले नागरिक मतदार यादीत आपलं नाव नोंदवू शकतील. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर पाहता येईल.

महाराष्ट्राच्या विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्रात दिवाळी विविध पध्दतीने साजरी केली जात असली. तरी आकाशदिवा आणि रांगोळी मात्र घरोघरी दिसतात. सक्षम लोकशाहीची पहिली पायरी ही मतदार नोंदणी असते, हे लक्षात घेऊन आकाशदिवा तयार करताना आणि रांगोळी काढताना, नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदवावं यासाठी आवाहन करता येईल.

आकाशदिवा आणि रांगोळी यामध्ये लोकशाही, निवडणूक, मतदान यासंबंधीच्या विविध प्रतीकांचा वापर करता येईल. उदा. डाव्या हाताचे अंगठ्याच्या बाजूचे शाई लावलेले बोट, मतदान केंद्र, मतदान पत्रिका, ईव्हीएम मशीन इ. वापरता येईल. शिवाय, मतदार नोंदणी; नाव वगळणी; तसेच, मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता, जन्मदिनांक, वय, लिंग, मतदार ओळखपत्र इत्यादी तपशील अचूक आहेत हे मतदार यादीत पाहावे; चुकीच्या तपशिलात दुरुस्त्या कराव्यात, याकरता मतदारांना आवाहन करण्यासाठी आकर्षक घोषवाक्यांचा वापर करता येईल.

ब-याच मतदारांना अस वाटत की, आपल्याकडे मतदार ओळखपत्र आहे म्हणजे आपण मतदान करु शकतो. पण तसं नाही, मतदान करण्यासाठी यादीत नाव असणं अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा सर्व मतदारांनी मतदार यादी पाहावी, तपशिलात बदल असतील तर संबंधित अर्ज भरावेत आणि 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी नाव नोंदणी करावी, या दृष्टीने आकाशदिवा आणि रांगोळी यांच्या माध्यमातून आपल्याला यंदाची दिवाळी लोकशाहीमय करायची आहे. त्याशिवाय मतदार नोंदणीचे अर्ज महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात देण्याची व स्विकारण्याची व्यवस्था करण्यात आल्याचेही आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

या अनुषंगाने मतदार नोंदणी अभियाना अंतर्गत फॉर्मची माहिती –

#नव्याने नाव नोंदणी करण्यासाठी – अर्ज क्र. 6
# परदेशात वास्तव्य असणा-या भारतीय नागरिकांसाठी – अर्ज क्र. 6 अ
# मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी – अर्ज क्र. 7
# नाव, पत्ता, वय किंवा अन्य दुरुस्त्यांसाठी – अर्ज क्र. 8
#विधानसभा अंतर्गत नाव स्थलांतर करण्यासाठी – अर्ज क्र. 8 अ

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.