Pimpri Vaccination News: महापालिका ‘ऑन स्पॉट वॉक इन’ लसीकरण करणार, परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामधील रहिवासी असलेल्या 18 ते 44 वयोगटातील उच्च शिक्षण्यासाठी परदेशी जाणा-या विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. त्यासाठी विविध कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. यासाठी महापालिकेच्या ‘मी जबाबदार ऍप ‘वर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर महापालिकेच्या पिंपरी येथील नवीन जिजामाता लसीकरण केंद्रावर लसीकरण केले जाणार आहे.

तसेच रविवार सोडून ठराविक लाभार्थ्यांना त्यांच्या राहत्या प्रभागाच्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर थेट (ऑन स्पॉट वॉक इन) लसीकरणाची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

याबाबतची माहिती देताना आयुक्त राजेश पाटील म्हणाले, रविवार व्यतिरिक्त आठवड्यातील सर्व दिवशी ठराविक लाभार्थ्यांना त्यांच्या राहत्या प्रभागाच्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर थेट (ऑन स्पॉट वॉक इन) लसीकरणाची सुविधा उपलब्ध राहील. यामध्ये 45 वर्षे व अधिक वयोगटातील नागरिक, कोविशील्ड लसीच्या पहिल्या व दुस-या डोसचे लाभार्थी, आरोग्य कर्मचारी व आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी वर्गातील कोविशील्ड लसीचे दुस-या डोसचे लाभार्थी, कोव्हॅक्सीन लसीच्या दुस-या डोसचे लाभार्थी यांचा समावेश असेल.

यामध्ये दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल. तसेच एक वर्षापेक्षा लहान बाळ असणा-या स्तनदा मातांचेदेखील लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी बाळाचा जन्मदाखला अनिवार्य असेल.

शहरामधील रहिवासी असलेल्या 18 ते 44 वयोगटातील उच्च शिक्षण्यासाठी परदेशी जाणा-या विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाईल. यासाठी परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र, परदेशी व्हिसा, व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले संबंधित परदेशी विद्यापीठाच्या विदेशी व्हिसासाठी प्रवेश पुष्टीकरण आणि आय-20 किंवा डीएस-160 फॉर्म आदी वैध पुरावे आवश्यक असतील.

या लसीकरणाकरीता महापालिकेच्या मी जबाबदार या ऍपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांचे महापालिकेच्या पिंपरी येथील नवीन जिजामाता लसीकरण केंद्रावर लसीकरण केले जाईल. मी जबाबदार या ऍपवर नोंदणी चालू राहणार असून गुरुवार ते बुधवार या कालावधीमध्ये नोंदणी केलेल्या लाभार्थींचे आठवडयामधील दर शनिवारी लसीकरण करण्यात येईल. लसीकरण कार्यक्रम रविवारी बंद राहील.

आजारामुळे अंथरुणावर असलेल्या व्यक्ती अथवा रुग्ण तसेच गतिमंद व्यक्तींचे त्यांच्या घरी जावून कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी मी जबाबदार या ऍपवर नोंदणी करणे आवश्यक असेल, असेही आयुक्त पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.