Pimpri: लग्नाविषयीच्या वादातून प्रेयसीचा डोक्यात दगड घालून खून; प्रियकर गजाआड

एमपीसी न्यूज – लग्नाविषयी बोलण्यासाठी गेलेल्या प्रेयसीचा प्रियकराबरोबर वाद झाला. याच वादातून प्रियकराने तिच्या डोक्यात दगड आणि विट मारली. गंभीर जखमी झाल्याने यात प्रेयसीचा मृत्यू झाला. हा प्रकार बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता पिंपरीतील एचए कॉलनी येथे घडला. याप्रकरणी प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.

आकाश ऊर्फ अक्षय विनायक लाखे (वय-20, रा. भोरमळा, नाशिक रोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. किरण अरूण काते (वय-23, रा. महात्मा फुलेनगर, झोपडपट्टी, भोसरी) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी (मुलीचे) तिचे मामा रविंद्र दामोदर ससाणे (वय-38) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण आणि आकाश यांच्यात प्रेमसंबंध होते. किरणने आरोपीकडे लग्नासाठी तगादा लावला होता. बुधवारी पुन्हा तिने आरोपीकडे लग्नाचा विषय काढला. यातून झालेल्या वादातून आकाशने तिच्या डोक्यात दगड आणि विट घातली. गंभीर जखमी झाल्याने यात किरणचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.