_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri: महापालिकेचे ‘येस’ बँकेत अडकलेले 984 कोटी रुपये अखेर परत मिळाले

बँक ऑफ बडोदा बँकेत केले जमा, महापालिकेला आर्थिक दिलासा

एमपीसी न्यूज – आर्थिक निर्बंधांमुळे खासगी क्षेत्रातील ‘येस’ बँकेत अडकलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 984 कोटी 26 लाख रुपये अखेर परत मिळाले आहेत. गुरुवारी (दि.19) रात्री उशिरा महापालिकेला पैसे मिळाले असून पिंपरीतील बँक ऑफ बडोदा या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पैसे जमा केले आहेत. 15 दिवसांनी महापालिकेला पैसे मिळाले आहेत. त्यामुळे महापालिकेला आर्थिक दिलासा मिळाला आहे.

येस बँकेची आर्थिक स्थिती खालावत असल्याने  भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) खासगी क्षेत्रातील येस बँकवर 5 मार्च रोजी निर्बंध लागू केले होते. त्यामुळे पिंपरी महापालिकेचे दैनंदिन कररुपी गोळा झालेले तब्बल 984 कोटी 26 लाख रुपये बँकेत अडकले होते. त्यामुळे महापालिकेला आर्थिक झटका बसला होता. मागील दोन वर्षांपासून ‘येस’ बँकेशी व्यवहार केला होता. महापालिकेचा दैनंदिन जमा होणारा भरणा ‘येस’ बँकेत जमा होत होता.

_MPC_DIR_MPU_II

या महसुलाचा वापर शहर विकास, कर्मचा-यांच्या वेतनासाठी केला जातो. ठेकेदारांना मोबदला दिला जातो. तो मार्च 2020 पूर्वी देणे क्रमप्राप्त आहे. बँकेत पैसे अडकल्याने महापालिकेच्या ‘कॅशफ्लो’वरही परिणाम झाला होता. त्यासाठी येस बँकेत अडकलेले महापालिकेचे 984.26 कोटी तातडीने अदा करावेत, अशी विनंती प्रशासनाने केली होती. आरबीआयने दोन दिवसांपूर्वी ‘येस’ बँकेवरील निर्बंध उठविल्याने बँकेचे कामकाज सुरळीत झाले होते. त्यानंतर गुरुवारी (दि.19) रात्री महापालिकेचे ‘येस’ बँकेत अडकलेले  984 कोटी 26 लाख रुपये परत मिळाले आहेत.

याबाबत बोलताना महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे म्हणाले, ”पिंपरी महापालिकेचे ‘येस’ बँकेत अडकलेले 984 कोटी 26 लाख रुपये परत मिळाले आहेत. गुरुवारी (दि.19) रात्री पैसे मिळाले. राष्ट्रीयकृत असलेल्या पिंपरी शाखेतील  बँक ऑफ बडोदामध्ये पैसे जमा केले आहेत. महापालिकेचे सर्व व्यवहार बँक ऑफ बडोदामधून होत आहे. दैनंदिन भरणा याच बँकेत केला जात आहे. तर, यापुढे राष्ट्रीयकृत बँकामध्ये पैसे ठेवण्यात येणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.