Pimpri : दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कमेची शिष्यवृत्ती तातडीने द्या -लक्ष्मण जगताप

आमदार लक्ष्मण जगताप यांची आयुक्तांना सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहरातील दहावी आणि बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कमेच्या स्वरुपात शिष्यवृत्ती दिली जाते. दहावी आणि बारावीचा निकाल लागून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. परंतु, महापालिकेने अद्याप दोन्ही परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कमेचे बक्षिस दिलेले नाही. विलंब करून विद्यार्थ्यांना बक्षिस देणे अन्यायाचेच ठरेल. या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी तातडीने कार्यक्रम घेऊन त्यांच्या गुणवत्तेचे जाहीर कौतुक करण्यात यावे, अशी सूचना भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजनेअंतर्गत शहरातील महिला, लहान मुले, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात.

  • या कल्याणकारी योजनाअंतर्गत दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक करण्याचा निर्णय झाला आहे. अशा विद्यार्थ्यांना रोख रक्कमेच्या स्वरुपात शिष्यवृत्ती दिली जाते. त्यानुसार 2018-19 या शैक्षणिक वर्षात दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना महापालिकेने रोख रक्कमेची ही शिष्यवृत्ती देणे अपेक्षित आहे.

दहावी आणि बारावीचा निकाल लागून दोन-अडीच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक वर्ष कधीच सुरू झाले आहे. परंतु, महापालिकेने या गुणवंतांची वेळेत कदर केलेली नाही. यातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती हलाखीची असणार आहे.

  • अनेक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. महापालिकेने या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कमेची शिष्यवृत्ती वेळेत दिली असती तर त्यांना अशा अडचणींतून थोडासा दिलासा मिळाला असता.

या गुणवंत विद्यार्थ्यांना विलंबाने रोख रक्कमेचे बक्षिस देणे हे अन्यायाचेच ठरणार आहे. महापालिकेने या विद्यार्थ्यांना निकाल लागल्यानंतर लवकरात लवकर शिष्यवृत्ती देण्याची एक कालमर्यादा निश्चित करावी.

  • दरवर्षी ठरलेल्या कालमर्यादेच्या आत या विद्यार्थ्यांच्या हातात रोख रक्कमेची शिष्यवृत्ती देण्याची काळजी प्रशासनाने घ्यावी. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक बळ मिळू शकेल. त्याचप्रमाणे 2018-19 या शैक्षणिक वर्षात दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंतांना रोख रक्कमेचे बक्षिस देण्यासाठी तातडीने कार्यक्रमाचे आयोजन करून या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे जाहीर कौतुक करण्याची सूचना आमदार जगताप यांनी केली आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.