Pimpri: कचरा जाळणा-या स्कूलवर दंडात्मक कारवाई; 25 हजारांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने शाळेच्या पाठीमागे कचरा जाळणा-या भोसरी, इंद्रायणीनगर येथील इंटेलिजेंट कॅडेट इंटरनॅशनल स्कूलवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे हे शहरात पाणी करत होते. क क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पाहणी करत असताना प्रभाग क्रमांक आठ इंद्रायणीनगर येथील इंटेलिजेंट कॅडेट इंटरनॅशनल स्कूलच्या मागील बाजूस कच-याचा ढीग जाळण्यात आल्याचे निदर्शनास आले.

त्यानुसार आरोग्य अधिका-यांनी तपासणी केली असता स्कूलच्या कर्मचा-यांमार्फतच कचरा जाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार या स्कूलविरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांच्या आदेशानुसार 25 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. सहाय्यक आरोग्य अधिकारी बी.बी.कांबळे यांनी दंड ठोठावला.

कचरा जाळणे अथवा विहित कार्यपद्धतीव्यतिरिक्त कच-याची विल्हेवाट लावणे. हा दंडनीय अपराध आहे. त्यामुळे या स्कूलविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. नागरिकांनी कोणत्याही स्वरुपाचा कचरा जाळण्यात येणार नाही. याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.