Pimpri: धक्कादायक ! चार वर्षाच्या चिमुकलीला कोरोनाची लागण, दोन महिलांचे रिपोर्टही पॉझिटीव्ह; सक्रिय रुग्णांची संख्या 34

आजपर्यंत शहरातील 47 जणांना कोरोनाची लागण; 12 रुग्ण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. मागील आठ दिवसांपासून शहरात दररोज रुग्णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटीव्ह येत आहेत. आज तीन महिलांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये एका चार वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 34 वर पोहचली आहे. आजपर्यंत शहरातील 47 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

महापालिकेने 75 संशयित रुग्णांच्या घशातील द्रावाचे नमुने आज (बुधवारी) तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्हीकडे) पाठविले होते. त्याचे रिपोर्ट आज उशीरा आले. त्यात एका चार वर्षांच्या मुलीसह तीन महिलांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील हे तीन रुग्ण आहेत.

त्यामध्ये चार वर्षांची एक मुलगी, 22 आणि 29 वय असलेल्या दोन महिला रुग्ण आहेत. हे तीनही रुग्ण भोसरी भागातील आहेत. दरम्यान, आज सकाळी पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्याला असलेल्या आणि पुण्यातील एका खासगी रुग्णालयात नोकरीला असलेल्या नर्सचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे एकाच दिवशी चार महिलांना कोरोनाची लागण झाली आहे.

मागील आठ दिवसांत 27 रुग्णांची वाढ

शहरात 8 एप्रिलपासून दररोज वैद्यकीय अहवालात कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण आढळून येत आहेत. 8 एप्रिलला एक, 9 ला तीन, 10 एप्रिल रोजी चार, 11 एप्रिलला दोन, 12 एप्रिलला पाच, 13 एप्रिल रोजी दोन, 14 एप्रिल रोजी एकाच दिवशी सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. तर, आज 15 एप्रिल रोजी सकाळी एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. आता तीन जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने मागील आठ दिवसात तब्बल 27 नवीन रुग्णांची भर पडली आहे.

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 47 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 34 रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यातील 30 रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, चार सक्रिय कोरोना बाधित रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, रविवारी (दि.9) एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.