Pimpri : ……अशी झाली ‘स्थायी’ अध्यक्षपदासाठी भाजपच्या विलास मडिगेरी यांची उमेदवारी निश्चित

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. दोन्ही निष्ठावान पदाधिका-यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. भाजपकडून अधिकृतपणे विलास मडिगेरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, अर्ज भरण्याच्या अंतीम वेळेपर्यंत भाजपची उमेदवारी निश्चित असलेल्या शीतल शिंदे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल भरला आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत गतवर्षी स्थायी समितीचा त्याग केलेल्या शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. परंतु, भोसरीकरांनी संतोष लोंढे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. गतवर्षी स्थायीचा राजीनामा दिल्याने शिंदे यांना संधी देण्याची निश्चित होते. भाजपकडून स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत शीतल शिंदे यांचे नाव निश्चित होते. अर्ज भरण्याच्या अर्धातास अगोदरपर्यंत शिंदे यांचे नाव अंतिम असल्याचे बोलले जात होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बैठकांमध्ये व्यस्त होते. त्यामुळे त्यांनी स्थायी समितीचा उमेदवार निश्चित करण्याचे अधिकार भाजपचे पक्षनिरीक्षक व विधानपरिषदेचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांना दिले होते. त्यामुळे सर्व सूत्रे ठाकूर यांनी पाहिली. ठाकूर यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना इच्छुक उमेदवारांची नावे सांगितले. त्यावर दानवे यांनी विलास मडिगेरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले अन् शेवटच्या 10 मिनिटांमध्ये मडिगेरी यांनी भाजपकडून अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज भरला.

अर्ज दाखल करताना दोन्ही आमदारांनी फिरविली पाठ

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना कारभारी असलेले भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि उपकारभारी, भोसरीचे आमदार महेश लांडगे गैरहजर होते. परंतु, मडिगेरी यांचा अर्ज भरताना आमदार जगताप यांचे समर्थक हजर होते. थेट प्रदेशाध्यक्षांनीच उमेदवार निश्चित केली असताना दोन्ही आमदारांनी उमेदवारी अर्ज भरताना पाठ फिरवली असल्याची जोरदार चर्चा शहराच्या राजकारणात रंगली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.