Pimpri : पालघर घटनेतील संबंधित दोषींवर कठोर कारवाई करा; हिंदू जनजागृती समितीची मागणी

एमपीसी न्यूज – पालघर येथे श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे संत कल्पवृक्षगिरी महाराज, सुशीलगिरी महाराज आणि त्यांचा वाहनचालक यांची हिंसक जमावाने पोलिसांसमोर प्रचंड मारहाण करून निर्घृण हत्या केली आहे. अशा हिंसक घटना रोखण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समिती केली आहे.

पालघर येथील हिंसक हत्येचा समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पोलिसच त्या वयोवृद्ध संतांना हिंसक जमावाकडे सोपवत असल्याचे दिसून येत आहे. जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असणारे पोलीसच हत्या करणार्‍यांना सहाय्य करत असतील, तर जनतेने कोणाच्या भरवशावर रहावे? असा सवाल हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

शिंदे पुढे म्हणतात, लॉकडाऊनच्या काळात पालघर येथे शेकडो लोकांचा जमाव रात्रीच्या वेळी जमून लाठी-काठ्यांसह बाहेर कसा पडतो. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे त्यामुळे सरकारने यासंदर्भात सखोल चौकशी करून संबंधित दोषी असणाऱ्यांना व पोलिसांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.