Pimpri : तपासासाठी नेलेल्या आरोपीने घटनास्थळावरून पोलिसांच्या हातावर दिल्या तुरी

नातेवाईकांच्या मतदतीने हुज्जत घालून आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळाला

एमपीसी न्यूज – चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला तपासासाठी घराजवळ आणले असता आरोपीने नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांशी हुज्जत घालून पोलिसांच्या ताब्यातून पळ काढला. भर दिवसा आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या आहेत. हा प्रकार बुधवारी (दि. 5) दुपारी दीडच्या सुमारास शेवाळे सेंटर कंपनीच्या आवारात पिंपरी येथे घडला.

नदीम गफूर शेख (वय 19) असे पोलिसांच्या हातून पळालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह सहारा नदीम शेख (वय 19), गफूर जावेद शेख (वय 32, सर्व रा. रिव्हर रोड, पिंपरी), आरोपीची मामे बहीण सुषमा राजू परदेशी (वय 18, शेवाळे सेंटर कंपनी आवार, पिंपरी) यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे रेल्वे पोलीस दलातील पोलीस हवालदार संजय तोडमल यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे पोलिसांनी आरोपी नदीम याला एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्या गुन्ह्याच्या तपासासाठी रेल्वे पोलीस हवालदार तोडमल, आदवडे आणि झगडे असे तिघेजण आरोपीला घेऊन बुधवारी दुपारी शेवाळे सेंटर कंपनीच्या आवारात पिंपरी येथे आरोपीच्या घराजवळ आले होते. त्यावेळी आरोपीचे नातेवाईक तिथे आले. त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला.

पोलिसांच्या तपासात अडथळा आणून गोंधळ निर्माण केला. या गोंधळाचा फायदा घेऊन आरोपी नदीम याने पोलिसांच्या तावडीतून सुटून धूम ठोकली. पोलिसांनी आरोपी नदीमसह त्याच्या नातेवाईकांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.