Pimpri: दिवे बंद करून मेणबत्ती पेटविण्याचा सल्ला म्हणजे देशवासियांची दिशाभूल – आण्णा बनसोडे

एमपीसी न्यूज – घरातील दिवे बंद करून मेणबत्ती, मोबाईल फ्लॅशची लाईट लावण्याचा सल्ला म्हणजे देशातील नागरिकांची दिशाभूल असल्याची टीका पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे यांनी केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमदार बनसोडे यांनी म्हटले आहे की, देशाच्या पंतप्रधानांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूची घोषणा करत पाच वाजता सर्वांना घंटा, थाळी, टाळी वाजवायला सांगितले. नागरिकांना वाटले कोरोना गेला, पण संकट कायम राहिले. आता पंतप्रधानांनी रविवारी लाईट लावायली सांगितली. परंतु, हे सर्व नागरिकांची दिशाभूल करणारे आहे.

देशावर कोरोनाचे संकट का ओढावले हाच प्रश्न आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये चीनमधून सुरु झालेल्या कोरोना साथीने डिसेंबर पासून जगभरात आपला विस्तार वाढविण्यास सुरुवात केली तेव्हा आपली उच्चस्तरीय जागतिक घडामोडीवर लक्ष देणारी यंत्रणा काय करत होती. कोरोनाबाबत केंद्र सरकारने वेळीच पाऊले उचलली असती तर देशातील सामान्य जनतेसमोर बेराजगारीचे व उपासमारीचे संकट उभे राहिले नसते.

आज 80 टक्के मध्यमवर्गीय, सामान्य जनता हवालदिल आहे. मजूर, घरेलू कामगार, हॉटेल कामगार, वेठबिगार, झोपडपट्टीत राहणारे, भिक्षुक, अनाथ, दिव्यांग अशा समाज्यातील कनिष्ठ व दारिद्र्य रेषेखालील जनतेचा यात काय दोष होता. केंद्रशासनाने वेळीच आवश्यक पावले न उचलल्याने ही परिस्थीती निर्माण झाल्याचा आरोपही बनसोडे यांनी केला आहे.

दरम्यान, केंद्र शासनाने राज्यातील जनतेला पुढील 6 महिने मोफत अन्न-धान्य पुरवठा करावा, यात स्थानिक परराज्यातील असा भेदभाव न ठेवता देशाचा नागरीक म्हणून केंद्रशासनाने जबाबदारी उचलून वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यासाठी राज्यांना मोठा निधी उपलब्ध करून द्यावा.

सामान्य नागरिकाने गरजेपोटी घेतलेल्या सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याज माफ करावे. वीज बिल, घरभाडे, घरपट्टी, पाणीपट्टी अशा सर्व देणी देण्यासाठी मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.