Pimpri: विस्कळीत पाणीपुरवठ्याचे गौडबंगाल काय? – भापकर

एमपीसी न्यूज – दोन महिन्यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये अपुरा व कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत नागरीकांनी तक्रारी, आंदोलने केली. पालिकेतील महत्वाचे पदाधिकारी शहरात असताना पाणी पुरवठा सुरळित झाला नाही. मात्र, पदाधिकारी परदेश दौऱ्यावर असताना पाणी पुरवठा सुरळित झाला आहे. यामागचे गौडबंगाल काय? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी उपस्थित केला आहे. संगनमताने नागरीकांना वेठीस धरुन कोणालातरी आपले इप्सित साध्य करण्याकरता जाणीवपूर्व कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली की काय? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, शहराचा गेल्या काही दिवसांपासून विविध भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. पाणी प्रश्नासाठी विविध ऱाजकीय पक्षांनी आंदोलने केली. त्यानंतरही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. मात्र, महापौर, सभागृहनेता, विविध पक्षाचे गटनेते, आयुक्त, मनपाचे महत्वाचे अधिकारी स्मार्ट सिटी अंतर्गंत स्पेन येथील बर्सिलोना या शहराचा अभ्यास करण्यासाठी दौऱ्यावर गेले. तर, अधिकारी दिवाळीची सुट्टी साजरी करीत आहेत. यापूर्वी दिवाळीची सुट्टी व शनिवार रविवार असे 8 दिवस म्हणजे एकूण 15 दिवस आपल्या व पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे शहराचा कारभार रामभरोसे चालू आहे. असे असतानाही मागच्या 20 दिवसापासून सर्व भागात पाणीपुरवठा सुरळीत व पुरेशा दाबाने होत आहे.

नागरिकांची पाण्याविषयी तक्रार नाही. मनपाचे महत्वाचे पदाधिकारी व महत्वाचे अधिकारी नसतानाही पाणीपुरवठा सुरळीत होत आहे. यामागचे गौडबंगाल नागरिकांच्या लक्षात येत नाही. हे सर्व संगनमताने नागरिकांना वेठीस धरुन कोणालातरी आपले इप्सित साध्य करण्याकरता जाणीवपूर्व कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली की काय ? अशी शंका भापकर यांनी उपस्थित केली आहे. याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर ठेवावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.