Pimpri : महापालिका तिजोरीची चावी भोसरीकडे की पुन्हा चिंचवडकरांकडे ?

सभापतीपदासाठी आरती चोंधे, शीतल शिंदे, संतोष लोंढे यांच्यात चुरस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत नवीन सदस्यांची निवड झाल्यानंतर आता तिजोरीची चावी तीस-या वेळी भोसरीकरांकडे जाते की पुन्हा चिंचवडकरांकडेच कायम राहते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. स्थायी समिती सभापतीपदासाठी चिंचवडमधील आरती चोंधे, शीतल शिंदे आणि भोसरीतील संतोष लोंढे यांच्यापैकी एकाची निवड होण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये भाजपच्या राजेंद्र लांडगे, संतोष लोंढे, शीतल शिंदे, आरती चोंधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर, मयूर कलाटे, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे आणि अपक्ष झामाबाई बारणे यांची शुक्रवारी (दि.22) निवड करण्यात आली.

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर महापौरपद आमदार महेश लांडगे यांच्या गटाकडे तर स्थायी समिती सभापतीपद आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकाकडे राहिले. भाजपचे पहिले महापौर होण्याचा मान नितीन काळजे यांना मिळाला. तर, सीमा सावळे या भाजपच्या पहिल्या स्थायी समिती सभापती झाल्या. त्या आमदार जगताप समर्थक म्हणून ओळखल्या जातात. दुस-या वर्षीचे स्थायी समिती सभापतीपद वाकडचे प्रतिनिधीत्व करणा-या ममता गायकवाड यांना मिळाले. त्याही आमदार जगताप यांच्या कट्टर समर्थक आहेत. गेल्या दोन्ही वर्षी जगताप समर्थकांना स्थायी समितीचे सभापतीपद तर लांडगे समर्थकांना महापौरपद मिळाले. त्यामुळे यंदा कोणत्या गटाकडे स्थायी समितीचे सभापतीपद जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

चिंचवडकरांकडे सभापतीपद जाणार असल्यास त्यासाठी गतवर्षी नाराज झालेल्या शीतल शिंदे यांचे नाव पुढे राहू शकते. त्यासोबतच ऐनवेळी आरती चोंधे यांचे देखील नाव पुढे येण्याची दाट शक्यता असून त्यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा भाजपच्या गोटात सुरु आहे. भोसरीकरांकडे गेल्यास संतोष लोंढे त्यासाठी प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे तिस-या वेळी स्थायी समिती सभापतीपद भोसरीकरांकडे जाते की पुन्हा चिंचवडकरांकडे कायम राहते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भोसरीतील समाविष्ट गावाला दोन वर्ष महापौरपद मिळाले. तर, पहिले दोन वर्ष स्थायी समिती चिंचवड मतदार संघाकडे होती; मात्र भोसरी शहरात कोणतेही मोठे पद मिळाले नाही. त्यामुळे आगामी स्थायी समितीचे सभापतीपद भोसरीचे ज्येष्ठ नगरसेवक संतोष लोंढे यांना देण्याची मागणी महापौर राहुल जाधव यांच्यासह भोसरीच्या सर्व नगरसेवकांनी काल, मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.

दरम्यान, सत्ताधारी भाजपने स्थायी समितीत पाच वर्षात दरवर्षी दहा आणि अपक्ष एक अशी 55 नगरसेवकांना संधी देण्यासाठी गतवर्षी समितीतील दहा आणि अपक्ष एक अशा 11 सदस्यांचे राजीनामे घेतले होते. त्यानुसार समितीतल उर्वरित सदस्यांचे राजीनामे घेतले जातात का? पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.