Pimpri Fire News : पिंपरीत लाकडाच्या कारखान्याला आग, पाच दुकाने जळून खाक

एमपीसी न्यूज – रिव्हर रोड पिंपरी येथे लाकडाच्या कारखान्याला आग लागली. ही आग पसरल्याने आसपासची अन्य चार दुकाने जळून खाक झाली. ही घटना आज (बुधवारी, दि. 10) पहाटे पावणे तीन वाजताच्या सुमारास घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रिव्हर रोड, पिंपरी येथे लाकडाचा कारखाना आहे. बुधवारी पहाटे पावणे तीन वाजताच्या सुमारास या लाकडाच्या कारखान्यात आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र ही आग भडकली आणि शेजारी असलेल्या भंगारच्या गोदामात पसरली.

त्याचबरोबर शेजारी असणाऱ्या किराणा स्टोअर्स आणि स्टेशनरी दुकानात देखील ही आग पसरली. या आगीत लाकडाचा कारखाना, भंगार गोडाऊन, किराणा आणि स्टेशनरी अशी एकूण पाच दुकाने जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पहाटे पावणे तीन वाजता अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड मुख्य अग्निशमन केंद्राचे दोन आणि रहाटणी उप विभागाचा एक असे एकूण तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. 14 जवानांनी अडीच तासात आगीवर नियंत्रण मिळवले. पाच दुकाने जळाल्याने आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.

दरम्यान, या घटनेत काही स्फोट झाल्याचे देखील स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले. मात्र अग्निशमन विभागाने याला दुजोरा दिला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.