Pimpri: चिंताजनक! शहरातील रुग्णसंख्या 15 हजार पार; चार दिवसात वाढले तीन हजार रुग्ण

Worrying! The number of patients in the city exceeded 15 thousand; Three thousand runes increased in four days : 148 दिवसात औद्योगिकनगरीतील रुग्णसंख्या 15 हजाराच्या पुढे गेली आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णसंख्येचा नकोसा असलेला 15 हजार रुग्णसंख्येचा आकडा पार झाला आहे. मागील चार दिवसांत म्हणजेच 22 ते 25 जुलै दरम्यान शहरात तब्बल तीन हजार नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. आज (शनिवारी) दुपारी दोन वाजेपर्यंत 382 नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 15 हजार 61 झाली आहे. 10 मार्च ते 25 जुलै या 148 दिवसात औद्योगिकनगरीतील रुग्णसंख्या 15 हजाराच्या पुढे गेली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मागील काही दिवसांपासून दररोज रुग्ण सापडण्याचा उच्चांक होत आहे. दिवसाला सहाशे ते सातशे जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये तब्बल साडेसहा हजार रुग्णांची वाढ झाली. लॉकडाउन उठल्यानंतर त्याचा परिणाम दिसेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

पण, ‘अनलॉक’च्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी 843 रुग्णांची नोंद झाली होती. त्यावरुन रुग्णवाढीचा आलेख उंचावलेलाच राहतो की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

21 जुलै पर्यंत शहरातील रुग्णसंख्या बारा हजार होती. त्यानंतर 22 ते 25 जुलै या अवघ्या चार दिवसात तब्बल तीन हजार नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. आत्तापर्यंत औद्योगिकनगरीतील रुग्ण संख्या 15 हजारवर पोहोचली होती.

आज दुपारी दोन वाजेपर्यंत तब्बल 382 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे औद्योगिकनगरीतील रुग्णसंख्या 15 हजार पार झाली आहे.

कोणत्या वयोगटातील कितीजणांना कोरोनाची बाधा ?

कोरोनाने तरुणांना विळखा घातला आहे. आत्तापर्यंत 22 ते 39 वयवर्ष असलेल्या शहरातील 6072 युवकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्वाधिक प्रमाण आहे.

त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 4328 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यानंतर 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 1544 तरुणांना कोरोनाची लागण झाली, तर 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 1360 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 1742 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

9146 रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात, 5647 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु

शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असली तरी, त्यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठे आहे. सक्रिय रुग्णांपेक्षा रुग्ण बरे होण्याची संख्या जास्त आहे. आजपर्यंत 9146 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

आजमितीला 5647 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी तब्बल 2679 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे.

तर, 840 रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असून 52 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 31 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर, आजपर्यंत शहरातील 275 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.