Pune News : सुपर स्प्रेडर ठरू शकणाऱ्याची पालिका करणार जागेवरच टेस्ट

एमपीसी न्यूज – शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता महापालिकेने शहरात रॅपिड अॅंटीजेन टेस्ट वाढविण्याचा निर्णय घेतला आहे तसेच भाजी विक्रते, दुकानदार, हॉटेल व्यवसायिक अशा सुपर स्प्रेडर ठरू शकतील अशा नागरिकांच्या जागेवर जाऊन चाचणी केली जाणार आहे. तसे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.

शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या दुपटीने वाढत आहे. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजाराच्या पुढे गेली आहे. हा झपाट्याने वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने ‘सुपर स्प्रेडर’ ठरु शकणाऱ्या रुग्ण लवकर शाेधून काढण्यासाठी रॅपिड अॅटीजेन टेस्ट वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार महापालिकेने कर्मचाऱ्यांची रॅपिड अॅंटीजेन टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये एक कर्मचारी काेराेना बाधित आढळून आला आहे. महापालिकेच्या प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांची टप्प्या टप्प्याने टेस्ट केली जाणार आहे.

महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयामार्फतही रॅपिड अॅंटीजेन टेस्ट करण्यासाठी पथके तयार केली आहे. ही पथके पथारी व्यावसायिक, भाजी विक्रेते, दुकानदार आणि दुकानातील कर्मचारी, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी जाऊन चाचण्या करणार आहे. याबाबतच्या सुचना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिल्या आहेत.

काेराेनाच्या संदर्भात यापुर्वी लागू केलेल्या नियमावलीनुसारच प्रतिबंधित क्षेत्राची घाेषणा केली जाणार आहे. ज्या इमारतीत पाचपेक्षा अधिक काेराेना बाधित रुग्ण आढळून येईल ती इमारत सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घाेषित केली जाणार असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकारांशी बाेलताना नमूद केले.

काेराेनाचा वेग वाढत असला तरी, लक्षणे साैम्य असल्यामुळे रुग्णालयात दाखल हाेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. परंतु, याच वेगाने रुग्ण वाढ हाेत गेली तर, रुग्णालयात उपचारासाठी दाखल हाेणाऱ्यांचे प्रमाणही वाढू शकते. ही गरज लक्षात घेऊन महापालिकेने नियाेजन केले आहे. सध्या महापालिकेचे आणि शासकीय रुग्णालयात बेडस उपलब्ध असुन, खासगी रुग्णालयातील बेडस असतील, तसेच साैम्य लक्षणे असणाऱ्यांकरीता काेविड केअर सेंटरही सुरु करता येईल असेही आयुक्त विक्रम कुमार यांनी नमूद केले.

महापालिकेकडे लस आणि औषधांचा पुरेसा साठा आहे. पंधरा ते अठरा वयाेगटातील मुलांसाठी लवकरच ‘वॅक्सिन ऑन व्हील’ हा उपक्रम राबविला जाणार आहे तसेच जम्बाेच्या स्ट्रक्चर अडीट संदर्भातही संबंधितांना सुचना दिल्या आहेत. मास्क न घालणाऱ्यांवर आणि रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आहे त्यानुसार कारवाईला सुरुवात झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.