Pune News : क्रीडामंत्री सुनील केदार यांची आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटला भेट

एमपीसी न्यूज – क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी आज (शुक्रवारी, दि. 7) पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटला (एएसआय) भेट दिली आणि तेथील विविध क्रीडा सुविधांची माहिती घेतली. यावेळी ‘एएसआय’चे कमांडन्ट कर्नल देवराज गील यांनी त्यांचे स्वागत केले. राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, लेफ्टनंट कर्नल दलजीत यावेळी उपस्थित होते.

कर्नल गील आणि लेफ्टनंट कर्नल दलजीत यांनी येथील विविध क्रीडा सुविधांची माहिती मंत्री सुनील केदार यांना दिली. भारोत्तोलन, बॉक्सिंग, धनुर्विद्या, वॉटर डायव्हिंग, अॅथलेटिक्स मधील विविध क्रीडाप्रकार, जलतरण, तलवारबाजी, कुस्ती, क्रीडा विज्ञानशाखा आदी ठिकाणांना भेट देऊन त्यांनी माहिती घेतली.

उंचीच्या ठिकाणावर ऑक्सिजनच्या कमतरतेचा शारीरिक क्षमतेवर परिणाम होऊ नये यासाठी हायपॉक्सिक चेंबरमध्ये खेळाडूंची करून घेण्यात येणारी तयारी, खेळाडूंच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी वापरण्यात येणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान आदी अनेक बाबींची माहिती ‘एएसआय’ च्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.

मंत्री केदार म्हणाले, आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमधून घडणारे खेळाडू देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करणारे आहेत. या खेळाडूंनी ऑलिम्पिक्स, जागतिक स्पर्धा आणि राष्ट्रीय स्पर्धांमधील विविध क्रीडाप्रकारात उच्च दर्जाची कामगिरी करून पदके मिळवून दिली आहेत. या सुविधांची माहिती राज्यात स्थापन होणाऱ्या देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात विविध अभ्यासक्रम आणि क्रीडा सुविधांच्या उभारणीसाठी उपयुक्त ठरू शकेल. त्यासाठी सामंजस्य करार करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असेही ते म्हणाले.

यावेळी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या नियामक परिषदेचे सदस्य निलेश कुलकर्णी, माजी ऑलिम्पिक खेळाडू मालव श्रॉफ आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.