Pune News: कवयित्री उर्मिला कराड यांचे निधन

एमपीसी न्यूज: ज्येष्ठ कवयित्री, लेखिका व माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या पत्नी उर्मिला विश्वनाथ कराड यांचे बुधवारी आकस्मिक निधन झाले. लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 79 वर्षांच्या होत्या. (Pune News) त्यांच्या पश्चात पती, मुलगा, पुतणे, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. एमआयटी संस्थेच्या जडणघडणीत प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांना त्यांनी मोलाची साथ दिली. सोबतच कवयित्री व लेखिका म्हणून त्यांनी त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. 

 

PMC ELECTION : ओबीसींना आरक्षण, खुल्या गटातील उमेदवारांची धाकधूक वाढली

 

 

मूळच्या नाशिकच्या असलेल्या उर्मिला कराड यांचे शिक्षण नाशिकच्या एच. पी. टी. महाविद्यालयातून झाले. १९६४ साली त्यांनी मराठी विषयात बी. ए. (ऑनर्स) ही पदवी प्रथम क्रमांकाने संपादित केली. (Pune News) लग्नानंतर त्या लातूर येथील रामेश्वर (रुई) आल्या. त्यांचे माहेर व सासर ही दोन्ही घराणी संपूर्ण वारकरी सांप्रदायाची असल्याने त्यांच्या मनावर संतसाहित्याचा विशेष प्रभाव होता. लहानपणापासून त्यांना काव्यलेखनाची आवड होती. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त  कविवर्य कुसुमाग्रज हे त्यांचे स्फूर्तिस्थान होते.

 

एमआयटी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या मातोश्री, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, तसेच आमदार रमेश कराड यांच्या त्या चुलती होत. उर्मिला कराड यांचे पार्थिव परमहंसनगर, कोथरूडमधील ज्ञानमंदिर या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी सकाळी 9 ते 9.30 या वेळेत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 10.30 च्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.