Pimpri News : ‘खोटेच… नाव घेती सारे चळवळीचे’, कवि संमेलनातून आंबेडकरी चळवळीचा इतिहासाला उजाळणी

एमपीसी न्यूज – “सारेच काही संपले नाही, इतक्यात मागे सरणार नाही” , “आमचा कांबळे” , “ना भेटले अजुनी कोणीच कळकळीचे, खोटेच नाव घेती सारे चळवळीचे” अशा विविध कवितांच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीचा इतिहासाला उजाळणी मिळाली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सागर काकडे यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कवी बबन सरवदे, दंगलकार नितीन चंदनशिवे, सुमित गुणवंत, समाधान गायकवाड आणि जित्या जाली यांनी कविता सादर करून रसिक मनावर अधिराज्य केले.

संविधान आणि देशाची सामाजिक,राजकीय, सांकृतिक स्थिती तसेच आंबेडकरी चळवळीची दशा, दिशा आणि वाटचाल यावर आधारित कवितांची मैफिल रंगली. यामध्ये बबन सरवदे यांनी “सारेच काही संपले नाही, इतक्यात मागे सरणार नाही” या कवितेच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीचा जाज्वल्य इतिहास जागृत केला. तर सुमित गुणवंत यांनी संविधान बचाव आणि जनजागृती यावर आधारित कविता सादर केली.

दंगलकार नितिन चंदनशिवे यांनी “आमचा कांबळे” या कवितेच्या माध्यमातून सामान्य माणूस लोंकांसमोर उभा केला. समाधान गायकवाड यांनी “ना भेटले अजुनी कोणीच कळकळीचे, खोटेच नाव घेती सारे चळवळीचे” या कवितेच्या माध्यमातून चळवळीचे वास्तव मांडले.

स्थानिक कलाकारांनी गीत गायनाच्या माध्यमातून महामानवांना मानवंदना देऊन सकाळच्या सत्राला सुरुवात केली. शाहीर सुरेश सूर्यवंशी आसंगीकर यांच्या ‘पोवाड्यांचा कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. “सूर सरगम सुराली” हा अंध कलाकारांचा कार्यक्रम झाला. अंध कलाकारांनी आपल्या गायन कौशल्याने उपस्थित रसिक श्रोत्यांची मने जिंकली.

अस्तित्व संस्था ठाणे, उन्मुक्त कलाविष्कार प्रस्तुत ‘अंधे जहाँ के अंधे रास्ते’ हे दोन अंकी मराठी नाटक सादर झाले. या नाटकात सफाई कामगारांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला. सफाई कामगारांचे अस्तित्व आपण मान्य केले नाही तर आपले अस्तित्व राहणार का ? असा प्रश्न यातून उपस्थित केला. त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्यांना कशा अडचणींचा सामना करावा लागतो, काम करत असताना त्या कामाचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर किती खोलवर परिणाम होतो याचे ज्वलंत प्रतिबिंब या नाटकाच्या माध्यमातून साकारण्यात आले.

यानंतर विशाल ओव्हाळ यांनी आपल्या गीत गायनाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. बापू पवार यांनी आपल्या पोवाड्यांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. आकाशराजा गोसावी यांनी आपल्या पहाडी आवाजातून उपस्थितांमध्ये स्फूर्ती निर्माण केली. साधना मेश्राम यांचा प्रबोधनात्मक गीत गायनाच्या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. सुप्रसिध्द महागायक प्रकाशनाथ पाटणकर यांच्या गीतांच्या बहारदार कार्यक्रमातून प्रबोधन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.