Mee Vasantrao Marathi Movie : संघर्षातून उमटलेला उत्तुंग ‘संगीतसूर’; ‘मी वसंतराव’

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राला नाट्यसंगीताची उज्वल परंपरा आहे. अजूनही नाट्यसंगीत ऐकणारी चोखंदळ, संगीतप्रेमी मंडळी आहेत. संगीतप्रधान चित्रपट मराठी प्रेक्षकांना भावतो. संगीतातील घराणेशाहीच्या चौकटीला न जुमानता संगीत क्षेत्रात आपला विशेष ठसा उमटवणा-या उत्कृष्ट गायकांमध्ये वसंतराव देशपांडे यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. पण त्यांनाही संघर्ष चुकलेला नव्हता. वयाच्या चाळीशी नंतरही त्यांना अस्तित्वासाठी लढावं लागलं, तरीही गाणं सोडायचं नाही आणि आपल्या दैवी सुरांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्यापर्यंतची वाटचाल ‘मी वसंतराव’ या चित्रपटातून उलगडली आहे. संघर्षातून उमटलेला उत्तुंग संगीतसूर अशीच या चित्रपटाची व्याख्या करता येईल.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सुरुवातीलाच वसंतराव देशपांडे यांचं ‘माझं आयुष्य जर शांत आणि नियमांनी बांधलेलं नव्हतं, तर माझं गाणं तरी एका चौकटीत राहून अडकेल कसं’ हे वाक्य आहे. इथेच चोखंदळ प्रेक्षकांना चित्रपटात नेमकं काय बघायला मिळणार हे कळतं. एका चौकटीतील गायकी न गाता वसंतराव देशपांडे यांनी सगळ्या प्रकारची गाणी गायली आहेत. गझल, नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत, लावणी, अभंग अशा सर्व प्रकारची गाणी चित्रपटात बघायला मिळतात. ती गाणी उगाच टाकायची म्हणून टाकलेली नसून योग्य ठिकाणी गरजेनुसार ती टाकण्यात आली आहेत.

वसंतराव देशपांडे यांचे बालपण ते ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकापर्यंतचा त्यांचा प्रवास चित्रपटात दाखवण्यात आला आहे. ‘जबाबदारी’ आणि ‘आवड’ या दोन शब्दांमधील संघर्ष यात बघायला मिळतो तसेच आयुष्यात आलेली चांगली माणसं आयुष्याला कशी कलाटणी देतात, याचंही उत्तम चित्रण यात केलं आहे. वसंतरावांच्या आयुष्यातला संघर्षाने भरलेला, खचून न जाण्याचा काळ प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. ही प्रेरणा घेण्यासाठी चित्रपटगृहात जायलाच हवं.

पु. ल. देशपांडे यांची भूमिका पुष्कराज चिरपुटकर याने साकारली आहे. दीनानाथ मंगेशकर यांची भूमिका अमेय वाघ याने साकारली आहे. तर वसंतराव देशपांडे यांची भूमिका त्यांचे नातू, प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी केली आहे. आजोबांच्या भूमिकेला योग्य न्याय राहुल देशपांडे यांनी दिला असून आजोबांच्या चालण्या, बोलण्या, वागण्यातील बारकावे त्यांनी बारकाईने टिपले आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी यांनी केलं असून निर्माते चंद्रशेखर गोखले हे आहेत. यासह कौमुदी वाळोकर, आरुष नंद, अनिता दाते, सारंग साठ्ये, मंदार गोखले, यांनी भूमिका केल्या आहेत. अनिता दाते यांनी वसंतराव देशपांडे यांच्या आईची भूमिका केली आहे.

जगातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवापैकी एक असेलल्या ‘कान’ (Cannes) चित्रपट महोत्सवासाठी मी वसंतराव हा चित्रपट राज्य सरकारकडून पाठवण्यात आला आहे. अडचणींचे अनेक डोंगर पार करून वसंतराव देशपांडे यांनी मिळवलेले आपले अढळ स्थान प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे. ही कथा अनेकांना स्वतःच्या आयुष्याशी जोडायला भाग पाडणारी आहे. त्यामुळे हा चित्रपट चित्रपटगृहात पाहायला हवाच.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.