Ravet News : बीआरटी मधून धावणाऱ्या खाजगी वाहनांना नागरिकांनी लावला ब्रेक

एमपीसी न्यूज – बीआरटी मधून सर्रास खाजगी वाहने चालवली जातात. यामुळे सार्वजनिक वाहतुकीला अडथळा येतो. वाहतुकीची शिस्त बिघडते तसेच रस्ता ओलांडण्यासाठी नागरिकांचा धोका वाढतो, यासाठी रावेत येथील नागरिकांनी रस्त्यावर येत बीआरटी मधून धावणाऱ्या खाजगी वाहनांना विरोध केला.

प्राजक्ता रुद्रवार, केतकी नायडू, रोशनी राय, प्रज्ञा साळुंखे, मोनल महादेवीया, नझला मल्लाही, अर्चना भोसले, अश्विनी सरदेसाई, मिथिला आवारे, पूनम सिंग, अदिती सिन्हा, नम्रता श्रीवास्तव, पार्थ राँय, रविंद्र खैरे आदींनी ही चळवळ सुरु केली आहे.

सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी, नागरिकांना चांगली सेवा मिळण्याच्या उद्देशाने बीआरटी मार्ग सुरू करण्यात आले आहेत. बीआरटी मधून पीएमपीएमएलच्या बस धावतात. मात्र अनेक वेळेला खाजगी वाहनांच्या अडथळ्यामुळे बीआरटी बस अडकून पडतात. शिवाय रस्ता ओलांडणा-या नागरिकांना बीआरटी रस्ता ओलांडण्यासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.

रावेत येथील सेलेस्टियल सिटी येथील बीआरटी ओपनिंगला अनेकदा अपघात होत आहेत. पीएमपीएमएलला अनेकदा नागरिकांनी कळवूनही जागोजागी नेमलेले अटेंडन्ट जागेवर नसतात. 1 ते 11 एप्रिलपर्यंत या बीआरटी रोडवर एकही अटेंडन्ट कामावर रुजू नव्हता, असे सामाजिक कार्यकर्त्या प्राजक्ता रुद्रावार यांनी सांगितले.

सर्व प्रकारचे कर भरूनही आपली सुरक्षा आपल्या हाती आहे असेच म्हणावे लागेल. बीआरटी रोडची संकल्पना पूर्णत: फ्लॉप आहे असे म्हणत खाजगी वाहन चालक सर्रास हा मार्ग वापरतात. पण ते चुकीचे आहे आणि जोपर्यंत तो मार्ग वाहतुकीस सुरू आहे तोपर्यंत रस्त्यावर जाणारया नागरिकांची सुरक्षा करणे हे प्रशासनाचे काम आहे. नागरिकांना सुरक्षितता मिळण्याची खात्री होईपर्यंत ही चळवळ सुरु राहणार असल्याचेही रुद्रावार यांनी सांगितले.

सेलेस्टियल सिटीेच्या नागरिकांनी बीआरटी रोडवर जनजागृती अभियान करण्यास सुरूवात केली आहे. मागील तीन फिवसंपासून हे अभियान सुरू असून या अभियानात बीआरटीतून खाजगी वाहनांना परतवून कृपया सुरक्षेचा विचार करून नियम मोडू नका असे प्रत्येकास आवाहन केले जात आहे.

शहरातील अन्य बीआरटी मार्गांवरही हीच स्थिती

पिंपरी-चिंचवड शहरात जुना पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते निगडी, मुकाई चौक ते रावेत पंपिंग स्टेशन आणि पुनावळे फाटा ते सांगवी या तीन मार्गांवर प्रामुख्याने बीआरटी मार्ग आहे. या मार्गावर खाजगी वाहने सर्रास बीआरटीतून धावतात. खाजगी वाहने अचानक बंद पडल्यास बीआरटीचा खोळंबा होतो. त्यामुळे खाजगी वाहतुकीला बीआरटीत बंदी असतानाही सुरु असलेल्या या वाहतुकीला चाप बसण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. पिंपरी येथे बीआरटी मार्गावर मागील महिन्यात एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन मृत्यू झाला. बीआरटी रोडमधून खाजगी वाहने जाऊ नये म्हणून लावलेल्या दोरीला अडकून हा अपघात झाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.