Pune News : अपघातग्रस्तास मदत करणाऱ्या जीवनदूतास मिळणार पाच हजार रुपये बक्षीस

एमपीसी न्यूज – रस्ते अपघातातील अपघातग्रस्त व्यक्तीस तात्काळ मदत करून त्याचा जीव वाचवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या जीवनदूतास रस्ते वाहतूक व परिवहन मंत्रालय, दिल्ली यांच्यामार्फत प्रोत्साहनपर पाच हजार रुपये बक्षीस देण्यात येते, अशी माहिती जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य सचिव तथा पुण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.

रस्ते अपघातातील अपघातग्रस्त व्यक्तीस गंभीर इजा झाली असल्यास अशा व्यक्तीस तात्काळ (गोल्डन अवर्स) रुग्णालयात दाखल करण्यामुळे अपघातग्रस्त व्यक्तीचा जीव वाचू शकतो. त्यामुळे अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होण्याच्यादृष्टीने अपघातग्रस्तास तात्काळ मदत करणाऱ्यांच्या संख्येत वाढ व्हावी या उद्देशाने ही योजना राबविण्यात येते.

योजनेची माहिती https://morth.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून ही योजना 31 मार्च 2026 पर्यंत कार्यान्वित राहणार आहे. मेंदूला मार लागणे, अतिशय रस्तस्त्राव होणे, पाठीच्या कण्यास मोठी इजा होणे आदी गंभीर इजा झालेल्या अपघातग्रस्त व्यक्तीस ताबडतोब रुग्णालयात दाखल करणे. अशा प्रकारची मदत जीवनदूताकडून होणे अपेक्षित आहे.

जीवनदूताची निवड जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती करणार आहे. राष्ट्रीय स्तरावर चालू वर्षातील सर्वोत्कृष्ठ जीवनदूताची निवड होणाऱ्यास प्रोत्साहनपर 1 लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे, अशी माहितीदेखील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.