Vadgaon Maval News : पोल्ट्री फार्मर आर्थिक अडचणींच्या गर्तेत; संवर्धन मूल्याचा धनादेश पोल्ट्री कंपन्यांनी वेळेत देण्याची मागणी

एमपीसी न्यूज – शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री संवर्धन व्यवसाय सुरू केलेले शेतकरी आर्थिक अडचणींच्या गर्तेत अडकले आहेत. पोल्ट्री कंपन्या पोल्ट्री शेतकऱ्यांना कुक्कुट पक्षी संवर्धनासाठी देतात आणि ठराविक दिवसानंतर पक्षी घेऊन जातात. पोल्ट्री शेतकरी या पक्ष्यांचे संवर्धन करतात.

शेतकऱ्यांना त्यांच्या संवर्धनाचा धनादेश पोल्ट्री कंपन्या लवकर देत नाहीत, त्यामुळे हे पोल्ट्री शेतकरी अडचणीत सापडतात. कंपन्यांनी पक्षी नेल्यानंतर 15 दिवसात संवर्धन मूल्याचा धनादेश पोल्ट्री शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी मावळ तालुका पोल्ट्री संघटनेकडून करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांनी शेतीला जोड धंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय सुरू केले आहेत. पोल्ट्रीकंपन्या आणि शेतकरी यांच्यात हा व्यवसाय करार पद्धतीने केला जात आहे.

कंपन्यांकडून पक्षी,खाद्य,औषधे, व्यवस्थापन पुरविले जाते तर शेतकरी 40 ते 45 दिवस पक्षाचे संवर्धन, पालन पोषण करतात.  शेवटी कंपनी सर्व पक्षी घेऊन जाते. शेतकऱ्यांना मात्र त्यांचा पक्षी  संवर्धनाचा धनादेश लवकर देत नाहीत, काही कंपन्या तर शेतकऱ्यांचे पेमेंट करण्यास खूपच उशीर करतात. पक्षी उचलल्यानंतर 15 दिवसाच्या आत पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले पाहीजेत अशी लेखी मागणी संघटक गोपाळे गुरूजी व त्यांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात केली आहे.

संघटनेचे संघटक सोनबा गोपाळे गुरूजी यांनी याबाबत पोल्ट्री कंपन्यांना निवेदन दिले आहे. पोल्ट्री संघटनेचे पदाधिकारी एकनाथ गाडे, प्रविण शिंदे, संभाजी केदारी, महेश कुडले, पप्पू ढवळे आदींच्या शिष्टमंडळाने विविध कंपन्यांच्या व्यवस्थापनाकडे मागण्यांचे लेखी निवेदन दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.