Pimple Gurav News : भाजपच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जगताप डेअरी येथील ग्रेडसेपरेटरचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या अगोदर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने साई चौक जगताप डेअरी येथील छत्रपती संभाजी महाराज ग्रेड सेपरेटरचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते आज (बुधवारी) उद्घाटन केले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते  साई चौक, जगताप डेअरी येथील ग्रेडसेपरेटर बांधकामाचे उद्घाटन करण्यात येणार होते. त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने उद्घाटन केले. प्रभाग 28 रहाटणी – पिंपळे सौदागर  येथील जगताप डेअरी साई चौक येथील वाकड वरून पिंपळे सौदागरला येणाऱ्या ग्रेड सेपरेटरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील आणि माजी विरोधी पक्षनेते, विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते फीत कापून उदघाटन करण्यात आले. ग्रेडसेप्रेटर नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

यावेळी नगरसेवक  मयुर कलाटे, नगरसेविका  शितल नाना काटे, सागर कोकणे,उद्योजक शिरीष साठे, सुमित डोळस, गौरव शितोळे, उत्तम धनवटे आदी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेविका शितल नाना काटे यांच्या पाठपुराव्याने या ग्रेड सेपरेटर चे काम पूर्ण करण्यात आले.

या ग्रेड सेपरेटरमुळे आता या ठिकाणी होणारी वाहतुकीच्या  कोंडीचा प्रश्न पूर्णपणे सुटणार आहे. विशेषतः पिंपळे सौदागरहून आयटी पार्क हिंजवडीला जाणाऱ्या नागरिकांना पूर्वी सारखी वाहतूक कोंडीची समस्या भासणार नसल्याचे काटे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.