Pune : पुणे परिमंडलामध्ये 40 हजारांवर थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा करा – महावितरणचे आवाहन

एमपीसी न्यूज : वारंवार आवाहन करून देखील (Pune) वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई वेगाने सुरू करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत पुणे परिमंडलातील 40 हजार 915 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

दरम्यान पुणे परिमंडलातील 6  लाख 6 हजार 568 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे 132 कोटी 89 लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. यामध्ये पुणे शहरातील 2 लाख 65 हजार 358 ग्राहकांकडे 44 कोटी 78 लाख आणि पिंपरी चिंचवड शहरातील 1 लाख 28 हजार 5 ग्राहकांकडे 33 कोटी 8 लाख रुपये तर ग्रामीणमध्ये आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांतील 2 लाख 13 हजार 205 ग्राहकांकडे 55 कोटी 3 लाख रुपयांच्या थकबाकीचा समावेश आहे.

महावितरणच्या महसूलाचा आर्थिक स्त्रोत प्रामुख्याने वीजबिलांची वसूली हाच आहे. वीज खरेदी, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च, कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापना आदींचा सर्व खर्च वीजबिल वसूलीवरच अवलंबून आहे. मात्र वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणकडून नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याच्या कटू कारवाईला वेग देण्यात आला. यात गेल्या दीड महिन्यात 40 हजार 915 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामध्ये पुणे शहरातील 27 हजार 84, पिंपरी चिंचवड शहरातील 7 हजार 44 तर ग्रामीणमध्ये आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांतील 6 हजार 787 थकबाकीदारांचा समावेश आहे.

थकीत वीजबिलांपोटी वीजपुरवठा खंडित करणे व खंडित केलेल्या (Pune) वीजजोडण्यांची तपासणी करण्यासाठी महावितरणचे सर्व अभियंता, अधिकारी, कर्मचारी सध्या ‘ऑन फिल्ड’ आहेत. मुख्य अभियंता राजेंद्र पवार परिमंडलात दौरे करून उपविभाग व शाखा कार्यालयांना भेटी देऊन थकबाकी वसूलीचा आढावा घेत आहेत.

विशेष म्हणजे एका महिन्याचे वीजबिल थकीत असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. त्यामुळे थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Pimpri News : महात्मा फुले महाविद्यालयात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांची 93 वी पुण्यतिथी साजरी

यासोबतच थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची विभाग, मंडल व परिमंडल कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरु आहे. थकबाकीदार हा शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास दोहोंविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी या महिन्यात शनिवारी व रविवारी महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहे. यासह घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.