Pimpri News : जनसंवाद सभेतील तक्रारींवरील कार्यवाहीसाठी सुयोग्य नियोजन करा; अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज – जनसंवाद सभा सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रभावी संवाद माध्यम ठरत आहे. या सभेमध्ये आलेल्या तक्रारवजा सूचनांवर सत्वर कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुयोग्य नियोजन आणि व्यवस्थापन करावे असे निर्देश जनसंवाद सभांचे नियंत्रण अधिकारी तथा अतिरिक आयुक्त विकास ढाकणे यांनी प्रशासनाला दिले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या आदेशानुसार आज महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडली. यामध्ये सुमारे ७५ नागरिकांनी प्रश्न आणि सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे १९, ८, ७, २, ८, ५, १३, आणि १३ इतक्या नागरिकांनी जनसंवाद सभेत उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले.

विकास ढाकणे म्हणाले, जनसंवाद सभेत आलेल्या तक्रारी, सूचनांवर कार्यवाही करत असताना निर्माण होणारे प्रश्न, अडचणी याबाबत सबंधित अधिकाऱ्यांनी सुयोग्य नियोजन करावे, नागरिकांचे प्रश्न लवकर सोडवण्यासाठी आराखडा तयार करून करत असलेल्या कार्यवाहीचा सातत्याने आढावा घेतला पाहिजे. त्याच तक्रारी पुन्हा उदभवू नये यासाठी विशेष उपाय योजना तयार करून त्यावर अंमल करणे गरजेचे आहे. सोडवलेल्या प्रश्नांबाबत संबंधित नागरिकांना अवगत करावे. त्याबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेतल्या पाहिजेत.

सोमवार 16 मे रोजी बुद्ध पौर्णिमा निमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने जनसंवाद सभा मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. अ, ब, क, ड, ई, फ, ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अनुक्रमे बीआरटीएसचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, बांधकाम परवानगी विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम, भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, उपआयुक्त विठ्ठल जोशी, सह शहर अभियंता सतीश इंगळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी भूषवले.

संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय क्षेत्रीय अधिकारी व सर्व विभागांचे विभागस्तरावरील अधिकारी या सभेस उपस्थित होते. मुख्य समन्वय अधिकारी हे जनसंवाद सभेसाठी आलेल्या प्रत्येक नागरिकांची तक्रार नोंदवून घेऊन त्यावर संबधित यंत्रणेला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

आज झालेल्या जनसंवाद सभेत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे, रस्त्यालगतचे पदपथ दुरुस्त करणे, रस्त्यांवर पथदिवे बसवणे, कामानिमित्त उखडण्यात आलेले रस्ते लवकर दुरुस्त करणे, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, रहदारीच्या रस्त्यांवर गतिरोधक आणि दुभाजक बसवणे, उच्च दाबाने, सुरळीत पाणीपुरवठा करणे, आवश्यक ठिकाणी नव्याने ड्रेनेज वाहिन्या टाकणे, सार्वजनिक शौचालये उभारणे, रस्त्याच्या कडेला पार्किंग करण्यात येणाऱ्या गाड्यांमुळे होणारी अडचण दूर करणे, आरोग्य आणि स्वच्छता संबंधी नागरिक आणि प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविणे अशा तक्रारवजा सूचना नागरिकांच्या वतीने जनसंवाद सभेत करण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.