Property Tax : मिळकत कर वसुलीसाठी कार, फ्रीज, टीव्ही जप्त करण्याचा निर्णय मागे घ्या – सीमा सावळे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने करदात्यांनी (Property Tax) मिळकतकर थकविला असेल तर त्यांच्या घरातील कार, फ्रीज, टीव्ही जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका प्रशासनाचा हा निर्णय अत्यंत चुकिचा असून त्यामुळे शहराची प्रतिमा मलिन होऊ शकते. तसेच थकबाकीदारांची समाजात आणि त्याच्या कुटुंबात नाचक्की करून वसुली करणे ही आपली संस्कृती नाही, म्हणून तो त्वरीत मागे घेण्याची मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

सावळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन – अडीच वर्षांत कोरोना काळात हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, धंदे बंद पडले. अनेकांना बँकांचे हप्ते थकल्याने सर्वस्व गमवावे लागले. अनेक घरांतून कमावणारे दिवंगत झाले. लाखो लोक देशोधडिला लागल्याचे चित्र आहे. गोरगरिबांच्या बेरोजगारांच्या हाताला काम नसल्याने समाजात प्रचंड असंतोष खदखदतो आहे. या सर्व परिस्थितीवर मात करून शहरातील उद्योग व्यवसाय चालक आता कुठे उभारी घेत आहेत. अशात मिळकत वसुलीसाठी लोकांच्या घरातील कार, फ्रीज, टीव्ही अशा घरगुती वस्तू जप्त कऱण्याचा आदेश हा अत्यंत चुकिचा वाटतो. सामान्य जनतेचा अशा प्रकारे अपमान करणे योग्य होणार नाही.

Sanjay Raut : गळ्यात भगवं उपरणं घालून संजय राऊत अखेर तुरुंगाबाहेर, शिवसैनिकांनी केलं स्वागत

महापालिकेचा 100 टक्के मिळकतकर वसूल झाला पाहिजे याबाबत दुमत नाही. जे करदाते थकबाकीदार आहेत त्यांना सुरवातीला नोटीस पाठविणे, नंतर अंतिम नोटीस देणे आणि अखेर मिळकत जप्तीची कारवाई करणे अशी एक सर्वसाधारण कायदेशीर पध्दत आहे. अन्यथा न्यायालयातूनही वसुली करता येते. मात्र आपण थेट कार, टीव्ही जप्त करण्याचा इशारा देताय, हे अत्यंत गंभीर आहे. पठाणी पध्दतीने महापालिका मिळकतकर वसुली करत असेल तर ते सहन करणार नाही. त्याचे विपरीत परिणाम संभवतात. प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारे वसुलीची पध्दत अवलंबिली तर एखादा अनुचित प्रकार घडू शकतो, त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहिल, असा गर्भीत इशाराही सावळे यांनी दिला आहे.

काही ठिकाणी कराबाबत वादाचे मुद्दे आहेत. कोरोना काळात (Property Tax) आर्थिक उलाढाल बंद असल्याने मिळकतकर माफ करावा, अशी मागणी महापालिका सभागृहात आम्ही केली होती. मिळकतकर वसुलीसाठी सनदशीर मार्ग अवलंबावा. थकबाकीदारांची समाजात आणि त्याच्या कुटुंबात नाचक्की करून वसुली करणे ही आपली संस्कृती नाही. त्यासाठी हा निर्णय आपण तत्काळ मागे घ्यावा, अशी विनंती  सावळे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.