PMRDA : “मुंडन” आंदोलन करत पीएमआरडीए प्रशासनाचा निषेध

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील (PMRDA) भक्ती शक्ती शिल्प समूहा लगतच्या जागा महापुरुषांची जयंती व सार्वजनिक उपक्रमाकरिता कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात यावा, या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षाच्या लोकांनी एकत्रित येऊन ‘मुंडन’ आंदोलन करून पीएमआरडीए प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. ‌

भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समिती, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई स्मारक समिती, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती समिती, महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती व समस्त निगडी ग्रामस्थांच्या वतीने पीएमआरडीए कार्यालय आकुर्डी येथे आज (सोमवार) 3 वाजता मुंडन आंदोलन केले.

यामध्ये सतीश काळे, सचिन काळभोर,रोहिदास शिवणकर, दिगंबर बालुरे, संतोष वाघमारे, रवींद्र कच्छवे या कार्यकर्त्यांनी स्वतःचे मुंडन करून पीएमआरडीए प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, शिवसेना ठाकरे गट युवराज कोकाटे, नागरी हक्क समिती सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, ओबीसी महासंघाचे अण्णा कुदळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष कविता आल्हाट, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय ससाने भाऊसाहेब आढागळे, देवेंद्र तायडे,आम आदमी पार्टीचे ब्रह्मानंद जाधव, वीर भगतसिंग संस्थेचे नकुल भोईर, नितीन सूर्यवंशी, ज्ञानदेव लोभे, मीरा कदम, सपना कदम, धनाजी यळकर पाटील, गणेश पाटील , रामदेव औशरमल, राजन नायर, प्रशांत चंद्र चंपल, राजू चांदणे सचिन शेट्टी, बाप्पू पोळ अजय कोकाटे आदी उपस्थित होते.

आम्ही मागील चार महिन्यापासून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने (PMRDA) करीत आहोत. पीएमआरडीए प्रशासन हालायला तयार नाही. संबंधित अधिकारी बिल्डरांची बाजू घेत समर्थन करीत आहेत. ही जागा युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, मोहम्मद पैगंबर, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर, महाराणा प्रताप यांच्या जयंती उत्सवासाठी, निगडी ग्रामस्थांच्या गाव जत्रेसाठी व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

 Alandi : आळंदी नगरपरिषदेची ‘माझी वसुंधरा’ अभियानात उत्तम कामगिरी

मात्र पीएमआरडीए प्रशासन या विषयाबाबत कुठलीही सकारात्मक भूमिका घ्यायला तयार नाही. या विषयाबाबत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पीएमआरडी अध्यक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा भूखंड सार्वजनिक उपक्रमाकरिता खुला राहावा असे पत्र दिले. त्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी अहवाल सादर करावा असा रिमार्क मारला आहे. त्यामुळे पीएमआरडीए प्रशासनाने हा अहवाल सकारात्मक व आमची मागणी पूर्ण होईल असा पाठवावा, असे मारुती भापकर यांनी सांगितले.

आंदोलनाचा समारोप झाल्यानंतर आयुक्त राहुल महिवाल यांना निवेदन देऊन जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर लोकशाही व सनदशीर मार्गाने उपोषण, रस्ता रोको, जेलभरो प्रसंगी आत्मदहन आंदोलन करण्याची आम्ही मागेपुढे पाहणार नाही. असा इशारा आंदोलकांनी दिला. यावर आम्ही येत्या शुक्रवार पर्यंत आमची भूमिका तुम्हाला कळवु असे आश्वासन महिवाल यांनी दिले. पीएमआरडीए प्रशासनाचा निर्णय आल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.