Pimpri News: कोरोना विषाणू सुरक्षा कवच योजना लेखाशिर्षकावरील तरतूदीत घट

एमपीसी न्यूज – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपकडून चार वर्षांपूर्वी आपणच घेतलेल्या निर्णयात बदल केले जात आहेत. स्मृतीचिन्ह देणे बंद करणा-या भाजपने पुन्हा स्मृतीचिन्ह देण्यास सुरुवात केली. महापालिकेतून सेवानिवृत्त होणा-या अधिका-यांना देण्याकरिता एक सन्मानचिन्ह 574 रुपयांना खरेदी केले जाणार आहे. त्यासाठी ‘कोरोना विषाणू सुरक्षा कवच योजना’ या लेखाशिर्षामधून 8 लाख रुपये ‘सांस्कृतिक कार्यक्रम’ या लेखाशिर्षावर वळविले आहेत. याबाबतच्या आयत्यावेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीने आज (बुधवारी) मान्यता दिली.

भाजपने सत्तेत येताच उधळपट्टीला चाप लावणार, ना खाऊंगा ना खाणे दुंगा असा नारा दिला. काटकसर, बचत असा कांगावा करत महापालिकेकडून छापली जाणारी दैनंदिनी बंद केली. स्मृतीचिन्हे देणे बंद केले. आता निवडणुकीच्या तोंडावर चार वर्षापूर्वी आपणच घेतलेल्या निर्णयात बदल केला. स्मृतीचिन्हांवर खूप मोठ्या प्रमाणात अनावश्यक खर्च होत असल्याचे सांगत 2018 मध्ये स्मृतीचिन्ह देणे बंद केले होते. आता सेवानिवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचा-यांना स्मृतीचिन्ह दिले जाणार आहेत.

महापालिकेच्या कामगार कल्याण विभागास सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी सांस्कृतिक कार्यक्रम या लेखाशिर्षावर 2 लाख 20 इतकी अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात आली. संपूर्ण तरतूद शिल्लक आहे. महापालिकेतून नियत वयोमानानुसार व स्वेच्छा सेवानिवृत्तीनुसार निवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचारी यांच्या सत्कारासाठी सन्मानचिन्ह खरेदी केले जात आहेत.

एक सन्माचिन्ह 574 या दराने 1200 सन्मानचिन्ह पुरविण्याचे काम चिंचवड येथील अर्थरॉन टेक्रॉलॉजिस अॅण्ड एंटरप्रायजेस यांना 2 ऑगस्ट 21 रोजी देण्यात आले. भांडार विभागाने त्याचे 6 लाख 19 हजार 920 बील ठेकेदारास मंजूर केले. हा खर्च कामगार कल्याण विभागाकडील सांस्कृतिक कार्यक्रम या लेखाशिर्षामधून खर्ची टाकण्याचे सांगितले. या लेखाशिर्षासाठी तरतूद अपुरी पडत आहे. त्यासाठी ‘कोरोना विषाणू सुरक्षा कवच योजना’ या लेखाशिर्षामधील तरतूदीत घट केली. त्यातील 8 लाख रुपये ‘सांस्कृतिक कार्यक्रम’ या लेखाशिर्षावर वळविले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.