Pimpri News : एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवा; अन्यथा रिक्षाचालक देखील संपाचे हत्यार उपसेल – बाबा कांबळे

एमपीसी न्यूज – केंद्र व राज्य सरकार भांडवलदारांच्या हिताचे धोरण राबवित आहेत. त्यांना नफा मिळावा या उद्धेशाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत देखील आता खाजगीकरणाचा घाट घातला आहे. महत्त्वाच्या एसटी डेपोच्या जागा व महत्त्वाचे रस्ते हे खासगी कंपन्यांना वाहतुकीसाठी खुले करून देण्याचा कुटील डाव लोकप्रतिनिधींचा आहे. एसटी व रिक्षा सारख्या सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या व्यवस्था या राज्यकर्त्यांना बंद करायच्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आता रिक्षा चालक देखील खांद्याला खांदा लावून उतरणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास रिक्षा चालक व मालक देखील रिक्षा बंद आंदोलनाचे हत्यार उपसेल असा इशारा, महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिला.

महाराष्ट्र रिक्षा पंचायत रिक्षा ब्रिगेडच्या वतीने संत तुकारामनगर पिंपरी, शिवाजीनगर व स्वारगेट येथील बस स्थानकातील आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. या वेळी बाबा कांबळे बोलत होते. नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष लक्ष्मण शेलार, सुरज सोनवणे, विजय वाघमारे आणि शिरसाठ, जाफर भाई शेख, रवींद्र लंके, प्रदीप आहेर आदी यावेळी उपस्थित होते.

बाबा कांबळे म्हणाले की, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच एक विधेयक मंजूर केले. त्यामध्ये खासगी महत्त्वाचे रस्ते मोठ्या भांडवलदारांना विकण्यास मुभा दिली आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्याचा हा डाव असल्याचे दिसतआहे. एसटी कामगारांना किमान वेतन मिळत नाही. किमान वेतन 22 हजार रुपये असताना कमी दिले जात आहे. केंद्र व राज्य सरकार हे अन्याय करत असतील तर न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल निर्माण झाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या अगदी रास्त आहेत.

सातवा वेतन आयोग यासह सर्व सुविधा मिळणे गरजेचे आहे. मेट्रो सारख्या प्रकल्पावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. मात्र 70 वर्षांपासून एसटी तर 50 वर्षांपासून रिक्षा चालक सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत कार्यरत आहेत. मात्र आज त्यांनाच उपासमारीचा सामना करावा लागत आहे. केंद्र व राज्य सरकारचे धोरण याला जबाबदार आहे. त्यामुळे आगामी काळात रिक्षा चालक मालक देखील एसटी कर्मचाऱ्यांप्रमाणे तीव्र आंदोलन करेल असा इशारा बाबा कांबळे यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.