Punawale : पुनावळेत कचरा डेपो होऊ देणार नाही – आमदार अश्विनी जगताप

एमपीसी न्यूज – पुनावळे येथे होऊ घातलेला कचरा डेपो मी होऊ(Punawale) देणार नाही, असे आश्वासन चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी पुनावळे पंचक्रोशीतील नागरिकांना दिले. पालिका प्रशासन ढिम्म झाले असल्याने त्यांचेही नाक दाबून तोंड उघडण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा सज्जड दम त्यांनी महापालिका प्रशासनाला दिला.

पुनावळे येथे प्रस्तावित कचरा डेपोच्या विरोधात पुनावळे, जांबे, मारुंजी, हिंजवडी, वाकड (Punawale)आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी रॅली काढली. त्यानंतर नागरिकांनी इथल्या वृक्षतोडीचा देखील विरोध केला. यावेळी चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी आंदोलन स्थळी येऊन नागरिकांना आश्वस्त केले.

Punawale : पुनावळे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या विरोधात नागरिकांचे चिपको आंदोलन

आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या, पुनावळे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांची कचरा डेपोसाठीची तळमळ माझ्या लक्षात येत आहे. यासाठी मी कायमच विरोध केला आहे. माजी आमदार स्व. लक्ष्मण जगताप यांनी देखील यासाठी सुरुवातीपासून विरोध केला होता. या ठिकाणी ऑक्सिजन पार्क व्हायला हवे. महिला आणि वृद्धांना इथे फिरता येईल. तरुणांना विविध उपक्रम राबवता येतील. आगामी अधिवेशनात हा मुद्दा मी उचलून धरणार आहे. इथे होणाऱ्या वृक्षतोडीबाबत वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांना निवेदन दिले आहे. त्यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. आता पुन्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वनमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करू.

पालिका प्रशासनाला धारेवर धरत जगताप म्हणाल्या, पालिकेचे नाक दाबले की तोंड उघडते. नगरसेवक नसल्याने प्रशासन ढिम्म झाले आहे. मी स्वतः आयुक्तांना सात ते आठ फोन केले. मात्र आयुक्त फोन उचलत नाहीत. योग्य पद्धतीने याचा पाठपुरावा केला जाईल. इथे कचरा डेपो होऊ देणार नाही, असे आश्वासन त्यांनी उपस्थित नागरिकांना दिले.

पिंपरी चिंचवड को ऑपरेटिव्ह सोसायटी फेडरेशनचे सचिन लोंढे म्हणाले, “पुनावळे येथील जंगल हे इथल्या नागरिकांसाठी ऑक्सिजन पार्क आहे. इथे कचरा डेपो झाल्यास इथल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल. मागील काही दिवसांपासून आम्ही हा प्रकल्प रद्द करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. त्यासाठी स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधींनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा.”

माजी नगरसेवक चेतन भुजबळ म्हणाले, “पुनावळे येथे सन 2008 मध्ये कचरा डेपोचे आरक्षण टाकले गेले. त्यावेळी इथे नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाले नव्हते. त्यावेळी ग्रामस्थांनी रास्ता रोको करून याचा विरोध केला. आता पुन्हा कचरा डेपोचा घाट घातला जात आहे. नागरिकांनी आयुष्य पणाला लाऊन या परिसरात घरे घेतली आहेत. कचरा डेपो झाल्यास इथल्या नागरिकांचे आयुष्य उध्वस्त होईल. कचरा डेपोचे आरक्षण असताना पालिकेने बफर झोनची मर्यादा 500 मीटरवरून 100 मीटर केली. हेही समजू शकत नाही. आम्हाला इथे कचरा डेपो नको आहे. कचरा डेपो कायमचा हटवा.”

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.