Pune : अमिन सयानी, गौतम घोष, लीला गांधी, एम. एम. कीरवानी यांना ‘पीफ’चे पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सव 2024’चा उद्घाटन (Pune) सोहळा गणेश कला क्रीडा मंच येथे 18 जानेवारीला संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. यावेळी भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल प्रसिद्ध रेडीओ उद्घोषक अमिन सयानी, दिग्दर्शक-अभिनेते गौतम घोष आणि प्रसिद्ध नृत्यांगना-अभिनेत्री लीला गांधी यांना ‘पीफ डिस्टींग्वीश अॅवार्ड’, तर संगीत संयोजक, गायक आणि गीतकार एम. एम. कीरवानी यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार एस. डी. बर्मन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा, आज महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी केली.

उद्घाटन सोहळ्यानंतर ‘अ ब्रायटर टुमारो’ (इटली, दिग्दर्शक – नानी मोरेत्ती) हा उद्घाटनाचा चित्रपट (ओपनिंग फिल्म) दाखवण्यात येणार आहे, तर ‘कीडनॅप्ड’ (इटली, दिग्दर्शक – मार्को बेलोचिओ) या चित्रपटाने महोत्सवाची (क्लोजिंग फिल्म) सांगता होणार असल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले. हे वर्ष सदाबहार अभिनेते देव आनंद (26 सप्टेंबर 1923), गायक मुकेश (22 जुलै 1923), दिग्दर्शक मृणाल सेन (14 मे 1923), प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक एनटीआर (28 मे 1923), संगीत दिग्दर्शक सलिल चौधरी (19 नोव्हेंबर 1923) आणि गीतकार शैलेन्द्र (30 ऑगस्ट 1923) यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार असल्याचे डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले.

यावेळी महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय ज्यूरींच्या नावाचीही घोषणा करण्यात आली. यामध्ये पेट्र झेलेन्का – (झेक प्रजासत्ताक – नाटककार आणि दिग्दर्शक), शाई गोल्डमन (इस्रायल – सिनेमॅटोग्राफर आणि चित्रपट निर्माता), सुधीर मिश्रा (भारत – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक), मंजू बोराह (भारत – चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक), सेतारेह इस्कंदरी (इराण – अभिनेत्री), उमरान सफ्तेर (तुर्कस्तान – चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता), सू प्राडो (फिलिपाईन्स – अभिनेत्री) आणि विसाकेसा चंद्रसेकरम (श्रीलंका – चित्रपट दिग्दर्शक, लेखक, नाटककार) यांचा समावेश आहे.

Pune : राम मंदिर लोकार्पणाचे निमंत्रण नाकारून कॉंग्रेसकडून हिंदूंच्या श्रद्धेची कुचेष्टा; भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांचा आरोप

या महोत्सवात विकास खार्गे, अविनाश ढाकणे, जानू बरुआ, शाई गोल्डमन, मनोज वाजपेयी यांचे (Pune) विविध विषयांवर मास्टर क्लास होणार आहेत. ‘नव्या मराठी सिनेमाच्या शोधात’ या विषयावर परिसंवाद होणार असून, त्यामध्ये निखिल महाजन, वरून नार्वेकर, रितेश देशमुख, मंगेश देसाई आणि संजय कृष्णाजी पाटील सहभागी होणार आहेत. तसेच चित्रपट महोत्सवांचे भविष्य आणि महत्त्व या विषयावरील परिसंवादामध्ये सैबल चटर्जी, बीना पॉल, एडवीनास पुकास्ता सहभागी होणार असल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले.

18 ते 25 जानेवारी दरम्यान ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सव 2024’ होणार आहे. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन (6 स्क्रीन), कॅम्प परिसरातील आयनॉक्स (3 स्क्रीन) आणि औंध भागातील वेस्टएंड मॉलमधील सिनेपोलीस चित्रपट गृहात (2 स्क्रीन) या तीन ठिकाणी एकूण 11 स्क्रीनवर चित्रपट दाखविले जाणार आहेत.

महोत्सवासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया www.piffindia.com या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू झाली असून, चित्रपटगृहांवर स्पॉट रजिस्ट्रेशन प्रक्रियाही सुरू झाली आहे. रसिक प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण महोत्सवासाठी नोंदणी शुल्क रुपये 800 फक्त आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.