Pune : लाचप्रकरणी आशिष बंगिनवार यांच्या कार्यालयाची मनसेच्या विद्यार्थी सेनेकडून तोडफोड

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे (Pune) अधिष्ठाता आशिष बंगिनवार यांनी व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्यासाठी 16 लाख रुपयांच्या लाचेची मागणी एका विद्यार्थ्याच्या पालकांकडे केली होती. त्यापैकी 10 लाख रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आशिष बंगिनवार यांना काल रंगेहाथ पकडले होते. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या विद्यार्थी सेनेकडून आशिष बंगिनवार यांच्या कार्यालया बाहेरील नावाच्या फलकावर प्रतिकात्मक नोटांचा हार घातला. तर कार्यालयातील साहित्यांची तोडफोड करीत निषेध नोंदविला.

पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळण्यासाठी सुमारे 15 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. तर शासनमान्य प्रक्रियेतून प्रवेश मिळण्यासाठी 22 लाख 50 हजार रुपये शुल्क आहे. मात्र त्या व्यतिरिक्त बंगिनवार यांनी एका विद्यार्थिनीच्या पालकांकडे 16 लाख रूपयांची मागणी केली होती.

त्याबाबत त्या विद्यार्थिनीच्या पालकांनी एसीबीकडे तक्रार केली (Pune) होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीने काल सापळा रचून आशिष बंगिनवार यांना 16 लाख रूपयांपैकी 10 लाख रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणाचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत तपास सुरु आहे. तर, त्या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

Charholi : चऱ्होली खुर्दमधील बाह्यवळणाच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त

त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे स्थानिक आमदार रवींद्र धंगेकर हे आज सकाळी कार्यकर्त्यांसह प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आले होते. त्यावेळी अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत होते. हे पाहून आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी आशिष बंगिनवार यांच्या ऑफिसबाहेरील नावाच्या फलकावर शाई फेकून निषेध नोंदवित घोषणाबाजी केली.

ही घटना थांबत नाही, तोवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष आशिष साबळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आशिष बंगिनवार यांच्या कार्यालया बाहेरील नावाच्या फलकावर प्रतिकात्मक नोटांचा हार घातला. तर कार्यालयातील साहित्यांची तोडफोड करीत निषेध नोंदविला.

यावेळी आशिष साबळे पाटील म्हणाले की, पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले. सर्व सामान्य कुटुंबातील विद्यार्थिनी शिक्षण घ्यावे हा त्यामागील हेतू होता.पण अधिष्ठाता आशिष बंगिनवार यांनी 10 लाखांची लाच घेतल्याचे प्रकरण समोर आल्याने यामध्ये लाखों रुपयांचा गैरव्यवहार झाला असणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी करून कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.