Pune Breaking News : पुण्यात मंडपाच्या गोडाऊनला आग; तीन कामगारांचा होरपळून मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यातील वाघोली परिसरातील उबाळे नगर येथील (Pune Breaking News) ‘शुभ सजावट’ या मंडपाच्या गोडाऊनला काल (शुक्रवारी) रात्री पावणे बाराच्या सुमारास आग लागली. या आगी जवळ असलेल्या  4 गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असून तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

घटनेची वर्दी मिळताच पुणे 5 व पीएमआरडीए 4 अशी एकुण 9 अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. या गोडाऊन जवळच एक रहिवासी इमारत आहे तर दुसऱ्या बाजूला गॅस सिलेंडरचे गोडाऊन आहे जिथे भरलेल्या स्थितीत 400 गॅस सिलेंडर होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळ असलेल्या रहिवासी इमारतीतील सर्व रहिवाश्यांना इमारतीमधून खाली उतरवले.

ही आग जवानांनी एक ते दीड तासात आटोक्यात आणली. मात्र गोडाऊन मोठे असल्याने अद्यापही कुलींगचे काम सुरु आहे. आग विझवल्यानंतर जवांनाना तेथे काम करणाऱ्या तीन कामगारांचे मृतदेह मिळाले आहेत. त्यातील दोघांचा जळून कोळसा झालेला आहे तर एक मृतदेह हा गॅस सिंलेडरसह जवळच्या पाण्याच्या टाकीत आढळला आहे. त्यामुळे तो स्फोटाने उडाला की तो आग लागलेला सिलेंडर विझवू पहात होता हे कळू शकलेले नाही. अद्याप मयतांची नावे व आगीचा कारण कळू शकलेले नाही.

यात सुदैवाने जवळच्या गॅस गोडाऊनला आगीची झळ पोहोचली नाही, अन्यथा पुण्याला एका मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले असते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.