Pune : पुण्यातील रस्ते रुंद करण्याचे प्रस्ताव रद्द करा; विरोधी पक्षांची अजित पवारांकडे मागणी

Cancel proposal to widen roads in Pune; Opposition demands Ajit Pawar

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील 323 रस्त्यांच्या रुंदीकरणाचे प्रस्ताव भाजपने बहुमताच्या जोरावर चुकीच्या पद्धतीने मंजूर केले आहे. हे प्रस्ताव रद्द करण्याची मागणी काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज, शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली.

या तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आज उपमुख्यमंत्री पवार यांची आज भेट घेत ही मागणी केली. आमदार चेतन तुपे, सुनिल टिंगरे, महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार आदी यावेळी उपस्थित होते.

पुण्यातील रस्ते रुंदीकरणाच्या प्रश्नाबाबत येत्या मंगळवारी मुंबईत मंत्रालयात नगर विकास खात्याच्या प्रधान सचिवांसोबत बैठक आयोजित केली आहे. त्यामध्ये रस्त्यांच्या रुंदीकरणाबत निर्णय होणार आहे.

या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यातील सहा मीटर रस्ता नऊ मीटर करण्याचा स्थायी समितीने मान्य केलेला प्रस्ताव अडचणीत आला आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीने रस्ते रुंदीकरणाबाबत घेतलेला निर्णय नियमबाह्य असल्याचे महापालिकेतील विरोधी पक्षांकडून सांगण्यात आले. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली.

त्यानंतर पवार यांनी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांसोबत बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेचा प्रस्ताव योग्य आहे का? महाराष्ट्रप्रादेशिक नगर नियोजन अधिनियमाच्या ३७ (१) अनुसार रस्ते रुंद करण्याची प्रक्रिया करावी का? याचाही निर्णय या बैठकीत होणार आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांनी महापालिकेच्या कारभारात आता लक्ष घातल्याने खमंग चर्चांना उत आला आहे. दरम्यान, भाजपने 323 रस्ता रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने मान्य केला आहे. त्याला मनसेचाही विरोध असल्याचे गटनेते वसंत मोरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.