pune : केंद्रीय पथकाकडून स्मार्ट सिटीच्या ‘करोना वॉर रुम’ची पाहणी

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या आंतर-मंत्रालयीन पथकाने मंगळवारी पुणे स्मार्ट सिटीच्या कमांड अँड कंट्रोल सेंटर येथील करोना वॉर रूमला भेट देऊन सद्यस्थितीची सविस्तर माहिती घेतली. पुणे महापालिका व स्मार्ट सिटीच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. एकात्मिक डॅशबोर्ड, जीआयएस मॅपिंग यंत्रणा याबाबत या पथकाने समाधान व्यक्त केले.

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजय मल्होत्रा यांच्या नेृतृत्वाखालील पाच सदस्यीय पथक पुण्यात आढावा घेण्यासाठी दाखल झाले आहे. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त महापालिकाआयुक्त व पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, शंतनू गोयल, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव, माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख राहुल जगताप व इतर अधिकारी उपस्थित होते. आयुक्त शेखर गायकवाड व रुबल अग्रवाल यांनी वॉर रूमचे स्वरूप व कार्यपद्धतीबाबत माहिती दिली.

महापालिकेने सुरू केलेल्या ७४ फ्लू क्लिनिकपैकी वडगाव फ्लू क्लिनिकला, तसेच सिंहगड कोविड केअर सेंटर, लायगुडे रुग्णालय, सोनावणे रुग्णालय आणि मोबाईल व्हॅनला पथकाने भेट दिली. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला. पुणे शहरात करोना संबंधी सर्वेक्षण करणारे कर्मचारी, डॉक्टर यापैकी कोणालाही अद्याप कोरोनाचा संसर्ग आढळून आलेला नाही. यावरून ते कर्तव्य बजावताना योग्य खबरदारी घेत आहेत हे दिसून येते. याबाबत केंद्रीय पथकाने समाधान व्यक्त केले.

विविध प्रशासकीय विभागांचा समन्वय साधून कोरोना बाबत उपाययोजना करण्यासाठी स्मार्ट सिटी कमांड सेंटर येथील वॉर रूमची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. या माध्यमातून करोनाचा प्रभाव नेमका कोणत्या भागावर, घटकांवर झाला आहे याबाबतचे विश्लेषण करणे शक्य होत आहे. मुरलीधर मोहोळ : महापौर, पुणे महापालिका.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.