Pune : पोलीस भरती प्रक्रियेत बदल; प्रथम होणार लेखी परीक्षा त्यानंतर शारीरिक चाचणी

पुणे अप्पर पोलीस आयुक्त यांची माहिती

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शासनाने पोलीस भरती प्रक्रियेत काही बदल केले असून यापुढे सुरुवातीला लेखी परीक्षा होणार आहे. शारीरिक चाचणी दरम्यान होणा-या दुर्घटना टाळण्यासाठी गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती पुणे पोलीस आयुक्तालयाचे अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) साहेबराव पाटील यांनी दिली.

अप्पर पोलीस आयुक्त पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचा-यांच्या कामाच्या स्वरूपात बदल झाला आहे. शारीरिक कौशल्य, कसरतीसह बौद्धिक कौशल्य वापरून पोलिसांना अनेक तपास करावे लागत आहेत. त्यामुळे पोलीस शिपाई पदावर बुद्धिमान उमेदवारांची निवड होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे.

त्याचबरोबर पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी दरम्यान काही वेळेला दुर्घटना झाल्या आहेत. त्या टाळण्यासाठी देखील या निर्णयाची मदत होणार आहे. पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची लेखी परीक्षा प्रथम घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी पोलीस घटक कार्यालयांच्या आस्थापनेवर रिक्त असलेल्या पदांच्या प्रमाणात आवश्यक तेवढ्या उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात येणार आहे. यामुळे भरती प्रक्रिया दीर्घकाळ सुरु न राहता जलद गतीने पार पडणार आहे. तसेच जिल्ह्याबाहेरून येणा-या उमेदवारांना जास्त दिवस ताटकळत राहावे लागणार नाही, असेही अप्पर पोलीस आयुक्त पाटील यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.