Pune : सत्ताधारी कोरोनाबाबत खुलासा करीत नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेनेचा सभात्याग

Congress-NCP-Shiv Sena resignation in protest of ruling party not disclosing about Corona

एमपीसी न्यूज – कोरोनासंदर्भात महापालिका प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, याचा खुलासा करण्याची मागणी वारंवार करूनही त्याचे उत्तर मिळत नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेनेतर्फे आज, गुरुवारी सभात्याग करण्यात आला.

महापालिकेची सर्वसाधारण सभा आज सलग दुसऱ्या दिवशीही कोरोना या विषयावरून गाजली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक याच मुद्द्यावरून आमनेसामने आले.

सर्वसाधारण सभा चालवा म्हणून नव्हे तर पुढील तीन महिने कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन कोणत्या उपाययोजना करणार याची माहिती द्यावी, अशी मागणी माजी माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केली.

कोरोना हे जागतिक संकट आहे, त्याला घाबरण्याचे काहीही कारण नाही, असे राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक बाबूराव चांदेरे म्हणाले.

तर, राज्य शासनाचे अधिवेशन तीन महिने पुढे गेले आहे, अशा परिस्थितीत सभागृहाचे कामकाज चालविणे बरोबर होणार नसल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

तर, कोरोनावरून आज राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप म्हणाले, कोरोनाच्या संकट काळात प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी चांगले कामकाज केले आहे.

त्यामुळे त्यांचे मनोबल वाढवा. त्यामुळे आपण भाजपच्या तहकुबिला पाठिंबा देत आहे. त्यावर हेमंत रासने यांनी जगताप यांचे आभार मानत त्यांनी चांगला सल्ला दिल्याचे सांगितले. ते सभागृहात जेष्ठ आहेत. त्यांचा तरी मान राखा, असे आवाहन केले.

पण, विरोधी पक्षांचे समाधान काही झाले नाही. कोरोनाच्या मुद्यावर आयुक्त खुलासा का करीत नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे आणि योगेश ससाणे यांनी उपस्थित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.