Pune : काँग्रेसच्या राहुल गांधींना सावरकरांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही -आमदार माधुरी मिसाळ यांची टीका

कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारकाजवळ निदर्शने

एमपीसी न्यूज – सावरकरांनी प्रत्येक तरुणाच्या मनात क्रांतीची ज्योत पेटविली. ते क्रांतिकारकांचे शिरोमणी होते. आमच्यासाठी ते पूजनीय आहेत. राहुल गांधी यांनी त्यांच्याबद्दल केेलेल्या आक्षेपार्ह विधानाचा आम्ही निषेध करतो. निवडणुकीच्या युद्धातून पळणार्‍या राहुल गांधींना सावरकरांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका भाजपच्या शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांनी केली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारकाजवळ निदर्शने केली. उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेता धीरज घाटे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, युवा मोर्चा अध्यक्ष दीपक पोटे यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राहुल गांधी यांच्या विधानाचा मी निषेध करतो. ज्याप्रमाणे सावरकरांनी विदेशी वस्त्रांची होळी केली, त्याप्रमाणे राहुल गांधी यांच्या विचारांची होळी करण्याची वेळ आली असल्याचे मत सभागृहनेते धीरज घाटे यांनी व्यक्त केले.

सावरकरांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी संघर्ष केला. त्यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेले विधान चुकीचे आहे. स्वातंत्र्यानंतर जन्म झालेल्या राहुल गांधींना सावरकरांच्या बलिदानाची माहिती नाही. त्यांना देशात राहाण्याचा अधिकार नाही, अशी टीका स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी केली. भाजपचे उपाध्यक्ष संदीप खर्डेकर, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांची भाषणे झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.